मला मांजरं आवडू शकतात पण त्यांनी मी फारशी आवडत नाही. एका मैत्रिणीच्या घरचं अगदी घरकोंबडं मांजरसुद्धा मी तिच्याकडे गेले की घराबाहेर जात असे.
पण लहानपणी साशा आणि आल्योश्याच्या रशियन गोष्टीच्या पुस्तकात पाहिलेलं, वेताच्या टोपलीत बसून आपले हिरवे डोळे मिचकावणारं मांजराचं चित्र अतिशय आवडायचं. आमच्या घरी पाळीव प्राण्यांबाबत ते किंवा मी असा म्युच्युअली एक्स्लुझिव्ह प्रकार असल्यामुळे अम्ही कधीच मांजरं वगरे पाळली नाहीत. तरीही सोसाने लहानपणी मी मांजराला उचलायला गेले की ते मला हमखास पंजा मारत असे. तेंव्हापासून मांजर उचलून घेण्याचा तिटकारा वाटतो.
या मार्जारवंशीय गुणांना केवळ अपवाद असं एक शुभ्रसं मांजर सध्या मैत्रिणीकडे आहे. त्याच्या आईने त्याला जन्म दिला तेंव्हा ते खरंच मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान दिसायच. फक्त शेपटी तेवढी काळी आहे त्याची. आधीच बोका आणि त्यातून अगदी भोळा सांब असल्यामुळे त्याला मंदार असं नाव मिळालेलं आहे. मी मैत्रिणीकडे रहायला जाते तेंव्हा रात्री त्याला दूध घालायचं काम मला आवडतं. त्यालाही त्याची जाण असावी कारण ते एकमेव माऊ आहे जे मला पाहून पळून जात नाही. उलट गप्पा मारतं. अर्थात त्याच्या कानांवरून, मानेवरून, गळ्यावरून पाठीवरून हात फिरवणे (आणि मग तातडीने डेटॉल लावून हात धुवून टाकणे) एवढाच त्याचा माझा संपर्क असल्यामुळे मी त्याला उचलायला जात नाही आणि ते आपणहून माझ्या मांडीवर बसत नाही. एकूणच या वंशाशी माझी तहयुक्त मैत्री याहून जास्त होणे शक्य नाही हे त्याने मला अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. तरीही फोनवरून त्याच्या नव्या नव्या करामती ऐकायला खूप मजा मात्र येते.
मांजरं ज्यांच्यावर आपणहून प्रेम करतात त्या लोकांचा मला हल्ली सूक्ष्म हेवा वाटायला लागला आहे..
गॅरिफिल्ड हा विश्वविख्यात बोका सोडल्यास मी मांजराला हातात घेत नाही त्यामुळे वर उल्लेख केलेल्या समस्त मार्जार स्वामी आणि स्वामिनींनी माझ्या वतीने आपापल्या 'मंदारां'चे लाड करावेत ही विनंती!
--अदिती