अज्जुका,
तुम्ही चित्रपटनिर्मिती क्षेत्रात आहात; तुम्हाला अनुभव वगैरे आहे हे मी मान्य करतो. पण थोडंफार आम्ही ही बघितलं आहे आणि वाचलं आहे. अगदी तुमच्याइतका अनुभव नाही गाठीशी पण थोडा कॉमन सेन्स आहे त्यावरून आणि ग्रामीण भागाची, तिथल्या लोकांच्या मानसिकतेची 'आशयगर्भ' चित्रपट निर्माण करणाऱ्यांपेक्षा नक्कीच चांगली जाणीव आहे म्हणून जे सत्य आहे ते लिहिलं. मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना 'बिनडोक' चित्रपट म्हणतात हे आजच कळलं. म्हणजे कोट्यवधींच्या भाषेत बोलणारे दाक्षिणात्य चित्रपट सगळे बिनडोक, तिथल्या नायक-नायिकांची पूजा बांधणारे कोट्यवधी प्रेक्षक ही बिनडोक आणि तुमचा फक्त एकच खेळ 'प्रभात' सारख्या ठिकाणी दाखवून कसे-बसे रडत-रखडत २-३ आठवडे पूर्ण करणारा आणि पुण्यातल्या मूठभर लोकांशिवाय अखिल महाराष्ट्रात कुणाच्याही खिजगणतीत नसणारा 'आशयगर्भ' चित्रपट बुद्धिमान काय? तुमच्या 'अर्थपूर्ण' चित्रपटांना बघायला जर काळं कुत्रं थिएटरमध्ये फिरकणार नसेल तर तुमचा चित्रपट बनवून आणि त्यात 'अर्थ' घालून आणि चित्रपटगृहचालकांना 'अर्थ' (पैसा) दवडायला लावून काय फायदा? श्याम बेनेगल, प्रकाश झा, गोविंद निहलानी सारख्या आर्ट सिनेमातील दिग्गज्जांना उमगले ते मराठीतल्या 'अर्थपूर्ण' चित्रपट बनविणाऱ्यांना कळू नये म्हणजे जगातले आठवे आश्चर्य आहे.
जगातल्या ९८% लोकांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'बिनडोक' (ते तसे नसतात हा मुद्दा वेगळा) चित्रपटच आवडतात. तुम्ही नाकारलतं म्हणून सत्य बदलत नाही. ज्यांना असा अस्सल मनोरंजनात्मक चित्रपट निर्माण करता येत नाही, कोट्यवधी लोकांच्या पसंतीला उतरता येत नाही ते मग काहीतरी अत्यंत कंटाळवाणं, रटाळ, गंभीर, असं खूप काहीतरी महान सादर केल्याच्या आविर्भावात सादर करतात आणि तिकिट खिडकीवर त्यांचे चित्रपट बघायला फक्त ते आणि त्यांचे नातेवाईक असतात. थिएटरचा मालक रडत असतो. हे सत्य आहे. तुम्ही जो 'आशयगर्भ' (हा शब्दच कसला विनोदी आहे ना! मजा वाटते दरवेळी लिहितांना. हे आपले मराठी चित्रपटवाले, म्हणजे जे चित्रपट-चित्रपट असे खेळतात ते हो! लहान मुले नाही का घर-घर खेळतात, तसं, कसे काय इतक्या वेळा हा शब्द म्हणू शकतात देव जाणे.) चित्रपट बनवता तो कोण बघायला येतं? मला वाटत नाही 'गोजिरी', 'नितळ', 'रेस्टॉरंट', 'एक होती वादी' सारखे चित्रपट भुसावळ किंवा इस्लामपूर किंवा जिंतूर सारख्या ठिकाणी कुणी ऐकले पण असतील; तिथे लागून त्यांनी हे चित्रपट पाहणं तर फारच दूरची गोष्ट झाली. मग काय 'अर्थपूर्ण' चित्रपट बनवून फायदा काय? त्यातला अर्थ कुणापर्यंत पोहोचतो आहे? त्यामुळे कुणाला रग्गड फायदा होतो आहे? कुणालाच नाही.
बेर्डे-सराफांनी मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळवून दिली. सराफांसारखा अभिनेता नाही झाला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये! त्यांच्या चित्रपटांमुळे पैसा आला मराठीत. त्यांच्या चित्रपटांनी लोकांना चित्रपटगृहांकडे खेचण्यात यश मिळवले. आणि तुम्ही त्यांना नावें ठेवताय? मान्य आहे की नंतर-नंतर त्या जोडगोळीच्या चित्रपटांचा दर्जा खालावला परंतु तो आधी सातत्याने होता तरी; सातत्याने त्यांनी चांगले चित्रपट यशस्वी करून दाखविले हे तुम्ही कसं नाकारू शकता? मी व्यावसायिक चित्रपट म्हणजे एक परीपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट असे म्हणतो आहे; अगदी व्यावसायिकतेच्या नावावर काहीही आचरटपणा मला देखील मान्य नाही. 'अशी ही बनवाबनवी', 'गम्मत-जम्मत', 'धूमधडाका', 'नवरा माझा नवसाचा', 'एकापेक्षा एक' हे दर्जेदार व्यावसायिक चित्रपट होते यात शंकाच नाही. आणि म्हणूनच ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आणि यशस्वी झाले. हे नशीब तुमच्या 'आनंदाचे झाड' किंवा 'दहावी फ' किंवा 'देवराई' च्या वाट्याला का नाही आले?
आणि दरवेळी तुम्ही तुमचा 'अर्थपूर्ण' (की आशयगर्भ?) सिनेमा घेऊन गावोगावी फिरणार आहात काय? हे शक्य आहे का? तसं असेल तर किती मरमर करावी लागेल आणि किती पैसे ओतावे लागतील? त्यातून तुम्हाला किती दमड्या मिळणार? मी छातीठोकपणे सांगतो, तुम्ही तुमचा 'अर्थपूर्ण' सिनेमा घेऊन माझ्या गावाला या. मी माझ्या वतीने १ आठवडा पूर्वप्रसिद्धी करतो. आपण मोफत खेळ आयोजित करू आणि बघू किती लोकं येतात आणि किती शेवटपर्यंत राहतात. नंतर एक चर्चा घडवून आणू की किती लोकांना तो आवडला, झेपला आणि किती लोकं तो पुन्हा बघायला येतील. बोला, तयार आहात काय? आणि असंच करून जर चित्रपट चालवायचा असेल तर मग आनंदच आहे!
तुमचं नवीन रक्त आहे म्हणून ही धुंदी असणं साहजिक आहे. मी ही १० वर्षापूर्वीपर्यंत असाच आर्ट, पॅरॅलल, सीरीयस सिनेमाचा खंदा पुरस्कर्ता होतो; मला 'शोले' पेक्षा 'दृष्टी' किंवा 'चेलुवी' आवडायचा; 'शराबी' पेक्षा 'मॅसीसाब' आवडायचा; 'तेजाब' पेक्षा 'तर्पण' आवडायचा... खूप तावातावाने भांडायचो मी मित्रांशी, भावाशी की हेच चित्रपट कसे श्रेष्ठ आहेत. नंतर नंतर मलाच उमगायला लागले; जसे मी थोडं-फार लिहायला लागलो तसे मला कळायला लागले की लोकांना २ तास हसवणं, त्यांना बाहेरची दुनिया विसरायला लावणं हे सोपं काम नाही किंबहुना ते 'दृष्टी' किंवा 'तर्पण' बनविण्यापेक्षा एक लाख पटीने अवघड आणि जास्त सर्जनशील काम आहे. स्वतःच्या आनंदासाठी कला निर्माण करणं ठीक आहे पण इतरांच्या आनंदासाठी ती निर्माण करणं आणि त्यांची वाहवा मिळवणं हे लवून कुर्निसात करण्यासारखं काम आहे! शिवाय जे प्रबोधन एक 'शराबी' करू शकतो ते प्रबोधन करायला १०००० 'आशयगर्भ' चित्रपट लागतील आणि इतकं करूनही ते चित्रपट फक्त मूठभर लोकांपर्यंत पोहोचतील आणि नंतर अडगळीत पडून राहतील. म्हणजे चित्रपट या माध्यमाची ताकतच हे 'असले' (होय, मला दळभद्रीच म्हणायचे आहे!) चित्रपट ओळखू शकले नाहीत असे म्हणायला हवे! नंतर यथावकाश श्याम बेनेगल, प्रकाश झा, गोविंद निहलानी, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, अमरीश पुरी, अमोल पालेकर या दिग्गज्जांना देखील ते उमगलं. नसिरुद्दीन शाह ची तर मुलाखत आली होती. 'ओये ओये' वर नाचतांना कसे वाटले असे विचारल्यावर तो म्हणाला की कलात्मक सिनेमा पोट नाही भरू शकत म्हणून इकडे आलो. संपलं, नंतर कलात्मक सिनेमा हळू - हळू हद्दपार झाला. व्हायलाच हवा होता.
तुमचं असं 'भारलेलं' रक्त आहे म्हणून मला तुमच्या 'आणि आहेत ना तुमच्यासाठी बिंडोक चित्रपट काढणारे. ते बघा आणि गप्प बसा ना. सगळ्यांनीच बिंडोकासारखं काम केलं पाहिजे हा आग्रह का? आणि हे सांगायचा तुमचा अधिकार तरी कुठला?' अशा उद्धट आणि हिडीस भाषेचा राग येत नाही. पण तुम्ही जसे 'अर्थपूर्ण' चित्रपट बनवता तशीच 'अर्थपूर्ण' चर्चा देखील घडायला हवी हे 'अर्थपूर्ण' चित्रपट बनविणाऱ्यांना 'मी' सांगायचं म्हणजे जरा विरोधाभासच आहे; नाही का? जाऊ द्या, कळेल तुम्हालाही एक दिवस 'अर्थपूर्ण' (की 'आशयगर्भ?) शब्दातला फोलपणा!!
--समीर