तो चालावा अशी इच्छा असेल तर त्यासाठी काय करायला हवे हे समीरजीना कळते पण त्या धंद्यात असणाऱ्याला कळत नाही तेही अनेक चित्रपट साफ आपटताना दिसत असताना हेही अनाकलनीय आहे !

यात अनाकलनीय असे काहीच नाही. आणि मी स्वतःला खूप अभ्यासू किंवा या क्षेत्रातला अधिकारी समजतो असे ही नाही. असे चित्रपट निर्माण करणारे पोटतिडकीने चित्रपट काढतात; ते चांगले ही असतील पण बहुतांशी ते 'आशयगर्भ' वगैरे भानगडीत पडतात आणि मग सगळा पचका होतो. बरं, त्यात अजून एक समस्या म्हणजे चित्रपट हे प्रेक्षकांसाठीचे माध्यम आहे हेच आपल्या इथे कुणी मान्य करत नाही. यात पुन्हा मराठी मानसिकता दिसून येते. जी गरज ग्राहकांची आहे ती बरोबर ओळखून माल द्यायचा आणि सनदशीर मार्गाने भरपूर नफा कमवायचा ही गोष्ट जर मराठी माणसाला नीट कळली असती तर आज गुजराती, राजस्थानी, सिंधी यांनी पादाक्रांत केलेले धंद्याचे क्षेत्र मराठी माणसाने नसते मिळवले? पुण्यात एकेकाळी असलेल्या मराठी दुकानांच्या मराठी मालकांना नसेल का वाटत की आपल्याला नफा व्हावा, धंद्यात आपली भरभराट व्हावी पण तसे झाले का? नाही. याला कारण एक विशिष्ट मानसिकता असते. कांदा पिकवणारे कांदा पिकवतात आणि त्यांच्या कांद्याला अचानक भाव कमी मिळतो आणि कांदा फेकून द्यावा लागतो म्हणून बाहेरच्या कुणी काही सूचना देऊच नये? त्या शेतकऱ्यांना जे शेकडो वर्षे कांदा पिकवत आहेत त्यांना वाटत नसेल की आपल्या कांद्याला भरपूर भाव मिळून खूप फायदा व्हावा, आपला कांदा वाया जाऊ नये? उलट कित्त्येक लोकांकडून सूचना घेऊन कांद्याचे पीक किती घ्यावे, मागणी किती असणार आहे, ज्यादा कांद्याची राखण आणि साठवण कशी करावी यावर उपाय शोधण्यात आलेले आहेत. १०० लोकं एखादे काम करत आहेत म्हणजे त्यात सुधारणेला वावच नसतो असे म्हणणे जरा बावळटपणाचे ठरेल.

आणि दाक्षिणात्य चित्रपटातील लोकांपेक्षा आपण अभिजात कलाकृती, अमक्यातील भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न, भावभावनांचा आलेख, हळुवार हाताळणी वगैरे गोष्टींचा जरा जास्तच विचार करतो आणि तोंडघशी पडतो. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मांडण्यापेक्षा प्रेक्षकांना काय बघायचे आहे ते दाखवा, किंवा जे तुम्हाला दाखवायचे आहे ते प्रेक्षकांना रुचेल अशा पद्धतीने दाखवा हा मंत्र जोपर्यंत अमंलात येत नाही तोपर्यंत मराठी चित्रपटांची अशीच ससेहोलपट आपल्याला हळू - हळू सगळ्या शहरांत पहायला मिळणार आहे.