माझ्या मते ज्याला जसे चित्रपट बनवावेसे वाटतात त्याला ते बनवण्याचे स्वातंत्र्य हवे. सिंहासन, सामना मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचे दगड होते. प्रत्येक चित्रपटाची त्यांच्याशी तुलना करणे योग्य नाही. दादा कोंडकेंचेही सुरुवातीचे चित्रपट त्यांची विनोदबुद्धी आणि जबरदस्त टायमिंग यामुळे निखळ विनोदी होते. पण त्यांचे नंतरचे चित्रपट कमरेखालच्या विनोदांमध्ये बुडून गेले.
कलात्मक आशयपूर्ण चित्रपट म्हणजे काहीतरी अगम्य अशी आपल्याकडे समजूत आहे. हे काही प्रायोगिक चित्रपटांच्या बाबतीत घडते. पण बरेचसे चित्रपट याला अपवादही असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्यजित रेंचे चित्रपट. आपल्या देशाचे दुर्दैव हे आहे की आपल्याला आपल्याकडे चांगले काय आहे हे दुसऱ्या कुणीतरी सांगावे लागते. सत्यजित रेंना ऑस्कर मिळाल्यावर दूरदर्शनला त्यांची आठवण झाली. त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये साधी सरळ कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायाचित्रण बघायला मिळते. असे असतानादेखील कलात्मकतेचा शिक्का मारून त्यांना दुर्लक्षिले जावे याहून दुसरी शोकांतिका काय असेल?
शेवटी गाडी त्याच मुद्यावर येते. आपल्याला अमुक आवडत नाही म्हणून कुणालाच ते आवडू नये असा अट्टाहास का? आणि दुसऱ्या कुणाला ते आवडत असेल तर त्याची खिल्ली उडवणे ही एकमेव प्रतिक्रिया देता येत असेल नक्कीच कुठेतरी, काहीतरी चुकते आहे.
हॅम्लेट