प्रिय सर्वसाक्षी,
सुभाषांबद्दल सर्वांना आदर, प्रेम आणि जिव्हाळा आहे याची जाणीव ठेवूनच मी हे लिखाण करत आहे आणि करत राहील. किंबहुना माझ्या मनातील काही शंकांना तुमच्या लेखमालेतून उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
आता पहिला मुद्दा रूढ चौकटीचा. आपण देशभक्ताच्या संबंधात जो काही विचार करतो त्याला गांधी कितपत कसोटीला उतरतात याबद्दल माझ्या मनात शंका आहे. गांधीच्या मनात इंग्रज शासनाबद्दल आदर आहे आणि हे ईश्वरी शासन आहे या बद्दल थोडीबहुत श्रद्धा आहे. असा विचार केला तर त्यांनी सविनय कायदेभंगाचा विचार आणि आचार समजून घेता येतो. ( गांधी एका संस्थानाच्या दिवाणाचे चिरंजीव आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.) त्याचबरोबर कायद्याचा अभ्यास त्यांना कायदे, त्यातील त्रुटी आणि त्यावरची उपाययोजनाही शिकवतो. आता या विचाराच्या चौकटीत सुभाष, सावरकर आणि भगतसिंग जे जन्मापासून ब्रिटिशांचा विरोध करतात अथवा त्यांची देशभक्तीची सर्वांना समजेल अशी व्याख्या, विचार आणि आचार आहे हे समजून घेता येते. मी या अर्थाने रूढ चौकट म्हणतो.
आता दुसरा मुद्दा सुभाष यांच्या कॉग्रेस अध्यक्षाच्या मुद्द्याबद्दल, सुभाष लोकशाही मार्गाने निवडून आले यात काही वाद नाही. परंतु कार्यकारी समिती ही गांधींनी निवडलेली अशी होती. कार्यकारी समिती आणि अध्यक्षामध्ये वाद होऊ नये किंवा त्या कारणे चळवळ क्षीण होऊ नये म्हणून गांधींनी सर्वांना राजीनामे द्यायला सांगितले यात कोणाचे चुकले? उलट सुभाषनी देशहिताचा व्यापक विचार करून जास्त न ताणता अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वादासाठी आपण असे सांगू शकतो की सुभाषमध्ये धमक होती तर त्यांनी गांधीच्या विरोधाला न जुमानता आपला कार्यकाळ संपवायला पाहिजे होता. परंतु अश्या संकुचित आणि क्षुद्र विचाराने देशहित साधले जात नाही हे गांधी आणि सुभाषांना अवगत होते हे नक्की. उलट सुभाषयांनी कोणत्याही प्रकारे गांधींचा अपमान, उपहास अथवा अवमान केला नाही. हा त्यांचा मोठेपणा माझ्या सामान्य दृष्टीला मोठा वाटत आला आहे.
सर्वसाक्षी, आपले प्रेम आणि कळकळ निर्विवाद आहे, परंतु आपला मानवी पैलूंचा अभ्यास कमी पडत आहे असे मला वाटते आणि त्यामुळे तुम्ही सत्याच्या जवळ जाण्यासाठी कमी पडत आहे असे मला वाटते. कृपया याही पैलूकडे लक्ष दिले तर तुम्ही एक सामान्य इतिहासकार म्हणून न राहता एक प्रगल्भ भाष्यकार अथवा द्रष्टे म्हणून विकसित व्हाल अशी मला खात्री आहे.
तूर्त इतकेच.
द्वारकानाथ