...'जी गरज ग्राहकांची आहे ती बरोबर ओळखून माल द्यायचा आणि सनदशीर मार्गाने भरपूर नफा कमवायचा ही गोष्ट जर मराठी माणसाला नीट कळली असती तर.....'

हे सगळे एकदम मान्य आहे. पण ह्या मराठी चित्रपटनिर्मात्यांना, जे काही चांगली कलाकृती (त्यांच्या मते) सादर करू इच्छितात, व ज्यांच्यावर तुमचा रोख आहे, ते केवळ धंद्यासाठीच हे करत आहेत असे कशावरून? म्हणजे त्यांचा असा दृश्टिकोन असू शकत नाही का, की 'हे एक कलेचे उत्कृष्ट माध्यम आहे, व मी ते त्यासाठी वापरतो आहे?' म्हणजे ह्या सगळ्याकडे ते निव्वळ धंदा म्हणून बघतच नसतील? त्यातून पैसे मिळाले तर ठीक, नाही तरीही हरकत नाही. ह्या कलाकारांनी 'काय करणार, आमचं पोट भरत नाही हो, लोकाश्रय नाही, म्हणून आम्ही आमचा चित्रपटनिर्मीतीचा धंदा आता गुंडाळला आहे' अशी कुठे तक्रार केल्याचे माझ्यातरी वाचनात नाही. आता नाकाखाली माईक सरकवल्यावर कुणीतरी 'लोकांना हे चित्रपट बघायला नकोत' वगैरे हळहळ व्यक्त केली असेल, पण ती तेव्हढीच.

थोडक्यात आपली कळकळ मला समजते पण हे चित्रपट काढण्यामागे ह्या निर्मात्या-दिग्दर्शकांची जी भूमिका असावी, ती व आपण जी भूमिका स्वीकारत आहात, त्यात मूलभूत अंतर असण्याची शक्यता आहे. काही माणसे कुठल्यातरी जाणिवेने झपाटून काम करत असतात. त्यांना त्यातून धनप्राप्तीची अपेक्षा नसतेच. आपल्याला जे जाणवले, जे बोचते आहे, ते व्यक्त करण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. ही मंडळी त्यांच्या अभिव्यक्तिच्या आनंदात मश्गूल असतात. त्यांचे चरितार्थाचे दूसरे काही साधन असू शकते. (जसे ते गोविंद निहलानी, श्याम बेनेगल ह्यांचे होते व आहे). काहीजण अजून दूसरा मार्ग स्वीकारतात-- काही चित्रपट एकदम गल्लाभरू काढायचे, त्यातून पैसा मिळवायचा व मग मधूनच आपणाला हवे तसे चित्रपट काढायचे (गुरू दत्त, काही अंशी राज कपूर).

ह्या मंडळींसाठी आनंदाची बाब ही की आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे चित्रपट काढण्याचे, तो प्रोसेस् करण्याचे व वितरण करण्याचे अनेक व स्वस्त मार्ग उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याचा ते अवश्य फायदा घेतील.