>>तिथल्या लोकांच्या मानसिकतेची 'आशयगर्भ' चित्रपट निर्माण करणाऱ्यांपेक्षा नक्कीच चांगली जाणीव आहे म्हणून जे सत्य आहे ते लिहिलं.<<
तुम्ही म्हणता तेच सत्य बाकी कशाला अर्थ नाही असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.
>>मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना 'बिनडोक' चित्रपट म्हणतात हे आजच कळलं. म्हणजे कोट्यवधींच्या भाषेत बोलणारे दाक्षिणात्य चित्रपट सगळे बिनडोक, तिथल्या नायक-नायिकांची पूजा बांधणारे कोट्यवधी प्रेक्षक ही बिनडोक आणि तुमचा फक्त एकच खेळ 'प्रभात' सारख्या ठिकाणी दाखवून कसे-बसे रडत-रखडत २-३ आठवडे पूर्ण करणारा आणि पुण्यातल्या मूठभर लोकांशिवाय अखिल महाराष्ट्रात कुणाच्याही खिजगणतीत नसणारा 'आशयगर्भ' चित्रपट बुद्धिमान काय?<<
वरच्या लेखातून दिसलेली तुमची मनोरंजनाची संकल्पना बिंडोक याच्यापलिकडे जाणारी जाणवली नाही. नाच गाणी आणि मारामाऱ्या यापलिकडे तुम्हाला तरी काही नकोय आणि माझ्या मते हे बिंडोक आहे. नटनट्यांची पूजा बांधली जाण्याइतपत, किंवा करोडोंच्या संख्येने लोकांनी पाहण्याइतपत क्रेझ निर्माण होणे या एकमेव निकषावर वस्तू चांगली असे म्हणायचे असेल तर मग सध्या चालत असलेल्या सगळ्या मालिका महानच म्हणायला हव्यात. तसंच चित्रपट हा नटनट्या सोडून इतर अनेक गोष्टींवर उभा असतो हे ही तुम्हाला माहित आहे असं दिसत नाहीये. दुसरं म्हणजे दक्षिणेतले सिनेमे(जे तंत्रज्ञान व मांडणी यामुळे तुम्हाला कश्यावरही विश्वास ठेवायला भाग पाडतात) आणि महेश कोठारेंची गिरणी याला एकाच मापात मोजायचे असेल तर काहीच अर्थ नाही. प्रभात मधे २-३ आठवडे रखडणे इत्यादी.... परत एकदा या वाक्यातून तुम्ही चित्रपटाच्या अर्थकारणाविषयीचे तुमचे घोर अज्ञान दाखवून दिलेत. ज्याला अर्थपूर्ण विषय म्हणता येईल असे कितीतरी सिनेमे आहेत ज्यांनी अर्थकारणाचे उत्तम गणित मांडलेय आणि मांडतायत. आमच्या सिनेमाने सुद्धा. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी मल्टिप्लेक्सेस मधे १० आठवडे झाल्यानंतर १-२ महिन्यांनी परत १०-१२ यशस्वी आठवडे सिनेमा चालला. काही मल्टिप्लेक्सेस मधे रांगा लावून ऍड. बु. ओपन झाल्याझाल्या हाउसफुलची पाटी लावावी लागली होती. तसेच एकपडदा चित्रपटगृहामधे सुद्धा. मुंबईत एकावेळेला ४-५ ठिकाणी चित्रपट उत्तम चालू होता.
>>तुमच्या 'अर्थपूर्ण' चित्रपटांना बघायला जर काळं कुत्रं थिएटरमध्ये फिरकणार नसेल तर तुमचा चित्रपट बनवून आणि त्यात 'अर्थ' घालून आणि चित्रपटगृहचालकांना 'अर्थ' (पैसा) दवडायला लावून काय फायदा?<<
किती दिवे लावणार आहात तुमच्या अज्ञानाचे? एक्झिबिटर(चित्रपटगृहचालक) हा भाडेतत्वावर किंवा कमिशन बेसिस वर चित्रपट दाखवतो. स्वतःच्या खिशातले पैसे घालून नाही.
>>जगातल्या ९८% लोकांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'बिनडोक' (ते तसे नसतात हा मुद्दा वेगळा) चित्रपटच आवडतात.<<
परत एकदा स्वतःला वाटतं तेच जगात प्रत्येकाला वाटतं असं म्हणणारं विधान. हे तुम्ही कुठल्या बळावर म्हणता आहात? ही आकडेवारी मिळवण्यासाठी मार्केटचा काय अभ्यास केला आहेत तुम्ही?
>>बेर्डे-सराफांनी मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळवून दिली. सराफांसारखा अभिनेता नाही झाला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये! त्यांच्या चित्रपटांमुळे पैसा आला मराठीत. त्यांच्या चित्रपटांनी लोकांना चित्रपटगृहांकडे खेचण्यात यश मिळवले. आणि तुम्ही त्यांना नावें ठेवताय?<<
परत एक चुकीची माहिती. मराठी चित्रपटातील प्रतिष्ठा, पैसा हे साधारण ७० च्या दशकातच लोप पावले होते. कौटुंबिक रडारडीच्या बाहेर पडून हलके फुलके चित्रपट आले (जे हिंदि किंवा इंग्रजीतील गाजलेल्या जुन्या सिनेमांचे फ्रेम टू फ्रेम रिमेक होते) नावीन्य म्हणून लोकांना आवडले. जरी यातली विनोदाची तऱ्हा केवळ प्रासंगिक आणि स्लॅपस्टीक अशी होती. नावीन्य ओसरल्यावर अर्थातच माकडचेष्टांना लोक कंटाळले त्यामुळेच नंतरचे तमाम चित्रपट कोसळले. अभिनेते म्हणून बेर्डे-सराफ दोन्ही महानच आहेत हो. पण त्यांचा चुकीचा वापर केला गेला ना. पण या कोसळत्या चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतला वितरक संपला. मराठी चित्रपटाला वितरक मिळणे अशक्य होऊन निर्मात्याला ते स्वतःच करायची वेळ आली.
>>आणि दरवेळी तुम्ही तुमचा 'अर्थपूर्ण' (की आशयगर्भ?) सिनेमा घेऊन गावोगावी फिरणार आहात काय? हे शक्य आहे का? तसं असेल तर किती मरमर करावी लागेल आणि किती पैसे ओतावे लागतील? त्यातून तुम्हाला किती दमड्या मिळणार?<<
मार्केटींगमधलं साधं तंत्र आहे. एकदा ब्रँडींग होईपर्यंत लोकांपर्यंत पोचावं लागतं. नंतर केवळ नाव बघून लोक येतात तुमचा सिनेमा बघायला. हे एक्झिबिटर्सच्या बाबतीत तर आहे झालेलं. आज आमच्या दिग्दर्शकाचा सिनेमासाठी मल्टीप्लेक्स पासून एकपडदा पर्यंत, शहरांपासून गावांपर्यंत सगळीकडचे एक्झिबिटर्स आपल्या इथे चित्रपट लागावा म्हणून उत्सुक आहेत. दुसरं हे जे काय फिरलो ना आम्ही ती एक मार्केटींग स्ट्रॅटेजी होती. ज्यासाठी चित्रपटाच्या बजेटमधे तरतूद असावी लागते. भव्य होर्डींग्ज आणि सततच्या प्रोमोज पेक्षा हे कमी खर्चात झालंय. आणि रिकव्हरी म्हणाल तर मूळ खर्चाच्या खूप वरती आहे.
>>मी छातीठोकपणे सांगतो, तुम्ही तुमचा 'अर्थपूर्ण' सिनेमा घेऊन माझ्या गावाला या. मी माझ्या वतीने १ आठवडा पूर्वप्रसिद्धी करतो. आपण मोफत खेळ आयोजित करू आणि बघू किती लोकं येतात आणि किती शेवटपर्यंत राहतात. नंतर एक चर्चा घडवून आणू की किती लोकांना तो आवडला, झेपला आणि किती लोकं तो पुन्हा बघायला येतील. बोला, तयार आहात काय? आणि असंच करून जर चित्रपट चालवायचा असेल तर मग आनंदच आहे!<<
हे असं निदान १०० गावांच्यात करून झालंय. तुम्ही काय छातीठोकपणे सांगता.. मी २ घटना सांगते, एका गावामधे जे चित्रपटगृह आहे त्याची प्रोजेक्शन क्वालिटी खूपच खालची आहे. आणि तिकिटाचे दर ७ व ९. अश्या ठिकाणी सिनेमा दाखवणं म्हणजे केलेल्या कामावर पाणीच. कारण सिनेमा नीट ऐकू आला नाही/ दिसला नाही तर काय अर्थ! दुसरं म्हणजे या तिकिटांच्या दरात मुंबईहून प्रिंट आणणंही परवडण्यासारखं नाही. त्यामुळे वेगळ्या हॉलमधे डिव्हीडी प्रोजेक्टरवर चित्रपट दाखवला. प्रोजेक्शन क्वालिटी त्या जुनाट थिएटरपेक्षा नक्कीच वरचढ होती आणि तिकिटांचे दरही जास्त ठेवले होते. तरीही सगळा हॉल खच्चून भरला होता. आणि चित्रपट संपून प्रश्नोत्तरे होईपर्यंत कोणीही उठून गेले नव्हते. दुसरी घटना अश्या गावातली जिथे थिएटरच नाही. एका शेडमधे डिव्हिडी प्रोजेक्टर लावून शो केला. गाव कोकणातलं, ऐन मे महिन्यात वादळी पाऊस सुरू झाला. शेड अशीच खच्चून भरलेली. शेडच्या बाहेरही काही जण पावसात भिजत सिनेमा बघतायत. आवाज संपूर्ण मोठा ठेवूनही पावसाने नीट ऐकू येत नव्हते म्हणून थोडं थांबायचं ठरलं. पाऊस किंचित कमी झाल्यावर परत सुरू केलं. एवढा वेळ कोणीही उठून गेले नाहीत. सिनेमा संपायला १५ मिनिटे असताना वीज गेली. मग पलिकडच्या गावातून जनरेटर आणला ह्यात १-२ तास गेले. तरी लोक तिथेच होते. जनरेटर आला आणि मग रात्री १ वाजता सिनेमाची शेवटची पंधरा मिनिटे लोकांनी पाह्यली. माझ्यामतेतरी या सर्व लोकांना चांगला चित्रपट बघायचा होता. बिंडोक चित्रपटापलिकडे जाऊन म्हणून त्यांनी ही कळ सोसली.
असंच करून चित्रपट चालवायचा असतो. लोकांना जर चित्रपटाबद्दल काहीच माहित नसेल तर ते कशाला येतील? अर्थपूर्ण चित्रपट बघायची भूक प्रत्येक खेड्यापाड्यातल्या माणसात आहे हे मी बघितलंय. तेव्हा बिनाअभ्यासाचे दावे करू नका.
>>तुमचं नवीन रक्त आहे म्हणून ही धुंदी असणं साहजिक आहे.<<
तुम्ही किती सिनियर किंवा मी किती ज्युनियर हा मुद्दा इथे नाहीये. आणि ते अधोरेखित करायचा प्रयत्नही करू नका. कारण मी जे लिहिते आहे ते एका यशस्वी(खेड्यापाड्यापासून राष्ट्रीय आणि आंतरऱाष्ट्रीय स्तरापर्यंत) सिनेमाच्या अनुभवातून लिहिते आहे. चित्रपटाच्या अर्थकारणाचा आणि गेल्या ५० वर्षातल्या प्रवाहांचा अभ्यास केलाय म्हणून लिहितेय. तेव्हा उगाच तुम्ही सिनियर आहात आणि मी नवीन असल्याने काहीही विधाने करतेय असलं चित्र तयार करू नका.
>>तुमचं असं 'भारलेलं' रक्त आहे<<
वैयक्तिक पातळीवर उतरायची गरज नाही.
>>म्हणून मला तुमच्या 'आणि आहेत ना तुमच्यासाठी बिंडोक चित्रपट काढणारे. ते बघा आणि गप्प बसा ना. सगळ्यांनीच बिंडोकासारखं काम केलं पाहिजे हा आग्रह का? आणि हे सांगायचा तुमचा अधिकार तरी कुठला?' अशा उद्धट आणि हिडीस भाषेचा राग येत नाही.<<
उद्धट आणि हिडीस? तुम्ही वरच्या लेखात जे दावे केलेत ना ते खरंतर त्या प्रकारचे आहेत.
>>पण तुम्ही जसे 'अर्थपूर्ण' चित्रपट बनवता तशीच 'अर्थपूर्ण' चर्चा देखील घडायला हवी हे 'अर्थपूर्ण' चित्रपट बनविणाऱ्यांना 'मी' सांगायचं म्हणजे जरा विरोधाभासच आहे; नाही का? जाऊ द्या, कळेल तुम्हालाही एक दिवस 'अर्थपूर्ण' (की 'आशयगर्भ?) शब्दातला फोलपणा!! <<
चर्चा या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणता ते संपूर्ण सत्य असा होतो का? तुमच्या सगळ्या विधानांच्या संपूर्ण विरोधी जाणारे अनुभव आणि निष्कर्ष माझ्याकडे असताना तुम्ही मला नवीन रक्त म्हणून उडवून लावताय आणि चर्चेच्या बाता करताय! व्वा!!