मलाही चहा आवडतो. मी चहाबाज झाले ते लग्न झाल्यानंतर. माझ्या सासरी (पुण्याला) दररोज चहाचे भांडे सतत उकळत असते. आलागेला खूप असल्यामुळे तो जो कोणी पाहुणा आलेला असेल त्याच्याच पुरता फक्त कधी चहा ठेवला जात नाही. आमच्या घरातलेही जो कोणी घरी येईल त्याप्रत्येकाबरोबर चहा घेत असतात. लग्न झाल्यावर कोणी आमच्या घरी आले की सासुबाई मला सांगायच्या "रोहिणी चहा टाक गं" मग मी घरातल्या  प्रत्येकाला विचारायचे "चहा घेणार का?" प्रत्येकजण "जास्ती नको, अर्धा कप" असे करता करता ५-६ कप चहा व्हायचा. मग साधारण तासा-दोन तासात अजून कोणीतरी यायचे की परत ५-६ कप. मला चहाचे भांडे विसळायचा खूप कंटाळा आहे त्यामुळे मी दरवेळेस वेगवेगळे भांडे वापरायचे. त्यामुळे दिवसभरात सगळी भांडी खाली यायची. काही वेळा चिडायला व्हायचे आणि म्हणायचे " हे काय? किती वेळा चहा? मी नाही हं करणार आता चहा. कुणाला पाहिजे असेल त्यांनी करून घ्या." विनायक iitb hostel वर असताना म्हणे ते सर्व मित्र मित्र दर तासातासाला चहा प्यायचे.

भारतात चहाची जी तल्लफ येते ना ती येथे अमेरिकेत येत नाही. त्यामुळे चहा इतका काही कमी झाला आहे की फक्त दिवसातून दोनदाच घेतला जातो. माझी आजी (आईची आई) खूप चहाबाज होती. पूर्वी घरात कामे भरपूर, त्यामुळे कामे करता करता तिला पण असाच तासातासाला चहा लागायचा. चहामुळे कामे करायची तरतरी येते. माझी आई तर चहाला पेट्रोलच म्हणते. पुण्यात गणपतीची मिरवणूक पहाता पहाता अधुन मधुन सुजाताचे वडे व अमृततुल्याचा चहा. मुंबईत उपहारगृहामधे जो चहा मिळतो तो मात्र मला अजिबात आवडत नाही. गार असतो आणि सगळीकडे एकच चव.

"चाय पिने का भी कोई वक्त होता है क्या? "हे मात्र अगदी खरे आहे.