अहो, मी सांगीतलेल्या फॅक्टसच आहेत आणि इथे तुम्ही वगळता प्रत्येक जण फॅक्टसच सांगत आहे. मराठी सिनेमा ला कोल्हापूरमध्ये काळं कुत्रं ही विचारेनासं झालं आहे ही फॅक्टच आहे ना? मराठी सिनेमा नेहमीच केविलवाणा असतो ही फॅक्टच आहे ना? तुम्हीच उगाच झापड बांधून सत्याकडे डोळे मिटून उभे आहात.

तुम्ही म्हणता तेच सत्य बाकी कशाला अर्थ नाही असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.
मी आयुष्याची २० वर्षे खेड्यात काढली आहेत. माझा जन्म, शिक्षण सगळं खेड्यातलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांची मानसिकता जेवढी मला कळते तेवढी पुण्या-मुंबईतल्या 'आशयगर्भ' चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना कळत नाही ही फॅक्ट आहे.

वरच्या लेखातून दिसलेली तुमची मनोरंजनाची संकल्पना बिंडोक याच्यापलिकडे जाणारी जाणवली नाही. नाच गाणी आणि मारामाऱ्या यापलिकडे तुम्हाला तरी काही नकोय आणि माझ्या मते हे बिंडोक आहे....
तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये असून देखील तुम्हाला हे माहित नाही की एक परिपूर्ण मनोरंजनात्मक सिनेमा काढणं हे किती अवघड काम आहे तर मग तुमचं चित्रपटांचं ज्ञान खूप तोकडं आहे असंच खेदाने म्हणावं लागेल. जरा एकदा अशा चित्रपटाची पटकथा लिहून बघा म्हणजे मग कळेल की अस्सल करमणूकप्रधान चित्रपट लिहिणे ही काय चीज असते. तुमचे 'आशयगर्भ' चित्रपट लिहायला काही फारसं डोकं लागत नाही. मी आधीही म्हटलं की ९९% लोकांना असेच करमणूकप्रधान चित्रपट आवडतात. मला एकट्यालाच आवडतात असे नव्हे. इथे बाकीची सगळी मंडळी हे कबूल करत आहे पण तुमची मतं ही तुमच्या अपुऱ्या ज्ञानावर आधारीत आहेत; वास्तवावर नाही. उगीच 'काय द्याचं बोला' एवढा चालला आणि तुमचा 'गोजिरी' किंवा 'सावली' १-२ फुटकळ थिएटर्समध्ये २-३ आठवडे आणि ते ही एकच खेळ करत तगला काय? 'माहेरची साडी', 'अशी ही बनवाबनवी' हे चित्रपट किती चालले आणि तुमचा 'आशयगर्भ' चित्रपट किती चालला? जरा डोळे उघडून बघा आणि मग विचार करा. हे सिनेमे खेडो-पाडी पोहोचले. अगदी आम जनतेने पहिले. पाहिला त्यांनी तुमचा 'नितळ' की 'आनंदाचं झाड'? नाही. त्यांनी हे सिनेमे ऐकले पण नाहीत. आता ते सगळे तुमच्या लेखी 'बिनडोक' असतील, नाही? काहीतरी उगीच...ठीक आहे; तुमचा कुठला आहे सिनेमा ज्याने गावोगाव फिरवून एवढं 'घवघवीत' यश मिळवलं? नाव तरी सांगा. ती काय तंबाखूची पुडी आहे सेल्समनने गावोगाव फिरून विकायला? अशी पब्लिसिटी मी तरी कुठल्याच चित्रपटाची ऐकली नाही. 'काय द्याचं बोला' ला असली नस्ती उठाठेव करावी लागली का? नाही. तुमच्या प्रॉडक्टमध्ये तेवढा दम नव्हता म्हणून तुम्हाला वणवण करावी लागली.

किती दिवे लावणार आहात तुमच्या अज्ञानाचे? एक्झिबिटर(चित्रपटगृहचालक) हा भाडेतत्वावर किंवा कमिशन बेसिस वर चित्रपट दाखवतो. स्वतःच्या खिशातले पैसे घालून नाही.
तुम्हाला तुमच्या अनुभवाची, ज्ञानाची टिमकी मिरवण्याची फार हौस आहे बुआ! एक्झिबिटरला वितरकांना भाडे द्यावे लागते आणि डेली कलेक्शन रिपोर्ट ज्याला डीसीआर म्हणतात, तो रोजचा रोज तयार करून त्यावरून ऑक्युपन्सी चा हिशेब करून ग्रॉस कलेक्शन आणि नेट काढतात. करमणूक कर वजा जाता जो निव्वळ नफा असतो (नेट) त्यात करारानुसार वितरकांचे, निर्मात्यांचे आणि इतकचं काय, नट-नट्यांचे शेअर काढले जातात.. हे सगळं माहित आहे हो! पण एका मराठी 'आशयगर्भ' चित्रपटाचे भाडे जर समजा ५००० रुपये असेल आणि थिएटरची ऑक्युपन्सी व्यवस्थित नसेल तर एक्झिबिटरची वाट लागतेच की नाही? त्याला तोटा होतोच की नाही? त्याचे वीजेचे बिल, स्टाफचा पगार, प्रोजेक्टरचा खर्च, कर हा सारा भूर्दंड पडतोच की नाही? मला हे म्हणायचे होते. जरा अर्थ समजून बोलत चला. केवळ 'आर्थिक नुकसान' हा अर्थ त्यात अभिप्रेत होता. पण तुम्हाला जिथे-तिथे स्वतःचं ज्ञान प्रकट करायची हौस असते त्याला कोण काय करणार? जाऊ दे; असते एकेकाला सवय!

परत एकदा स्वतःला वाटतं तेच जगात प्रत्येकाला वाटतं असं म्हणणारं विधान. हे तुम्ही कुठल्या बळावर म्हणता आहात? ही आकडेवारी मिळवण्यासाठी मार्केटचा काय अभ्यास केला आहेत तुम्ही?  
आता मला हसू अजिबात कंट्रोल होत नाहीये. अहो, याला मार्केटचा अभ्यास देखील कशासाठी करायला पहिजे? हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच तद्दन व्यावसायिक चित्रपट एवढ्या मोठ्या संख्येने बनतात आणि यशस्वी होतात ना? उगीच 'पार्टनर' एवढा चालतो आणि 'मैने गांधी को नही मारा' सडकून आपटतो का? उगीच 'आप का सुरूर' धोधो चालतो आणि 'ऐसा क्यूं होता हैं' (नसीरुद्दीन शाहचा पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न, याचं नाव देखील नीट आठवत नाही. पण असचं काहीसं बेंगरूळ नाव होतं, कधी आला आणि कधी डाराडूर झोपी गेला हे नसिरुद्दीन शाहला देखील कळलं नाही.) सपाटून झोपतो का? उगीच सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ गोष्टींसाठी मार्केटचा अभ्यास, आकडेवारी, स्टॅटीस्टिक्स, रीसर्च वगैरे भंपकपणाने काही साध्य होत नाही. फक्त स्वतःचं महत्त्व वाढवायला कामात येतात या गोष्टी. पण अखेरीस ते ही वाढत नाही.

परत एक चुकीची माहिती. मराठी चित्रपटातील प्रतिष्ठा, पैसा हे साधारण ७० च्या दशकातच लोप पावले होते. कौटुंबिक रडारडीच्या बाहेर पडून हलके फुलके चित्रपट आले (जे हिंदि किंवा इंग्रजीतील गाजलेल्या जुन्या सिनेमांचे फ्रेम टू फ्रेम रिमेक होते) नावीन्य म्हणून लोकांना आवडले....
मी आधीपासून चांगल्या, करमणूकप्रधान व्यावसायिक चित्रपटांविषयी बोलत आहे. बेर्डे-सराफांनी खूप चांगले आणि मुख्यत्त्वेकरून करमणूकप्रधान आणि सणसणीत यशस्वी चित्रपट दिले. नंतर लोकं त्यांच्या पांचट विनोदाला कंटाळले हा आपला मुद्दाच नाही. निदान तुमच्या 'आशयगर्भ' चित्रपटांपेक्षा निश्चित जास्त लोकांपर्यंत पोहोचले असतील ते चित्रपट! आपला मुद्दा आहे प्रेक्षकांना आवडणारे व्यावसायिक चित्रपट! त्यांना आवडलेले व्यावसायिक चित्रपट! आपला मुद्दा आहे प्रेक्षकांची आवड! त्यांच्यापर्यंत, अगदी खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचेल, चालेल आणि यशस्वी होईल असा चित्रपट!

मार्केटींगमधलं साधं तंत्र आहे. एकदा ब्रँडींग होईपर्यंत लोकांपर्यंत पोचावं लागतं. नंतर केवळ नाव बघून लोक येतात तुमचा सिनेमा बघायला....
चित्रपटांची अशी प्रसिद्धी मी पहिल्यांदाच ऐकली. अशी अफलातून प्रसिद्धी केलेला आणि यशस्वी झालेला तुमचा चित्रपट आहे तरी कोणता? मार्केटींगचं हे असलं तंत्र तंबाखूची पुडी, गुटखा, पान मसाला, कोल्ड्रींक्स वगैरे च्या बाबतीत करतात हे माहित होतं, चित्रपटाच्या बाबतीत ही करतात किंबहुना ते तसे करावे लागते हे आश्चर्यच आहे. सहसा प्रॉडक्टमध्ये दम नसला की असली मगजमारी करावी लागते असं म्हणतात. आपल्याला काही त्यातलं कळत नाही बुआ! 'काय द्याचं बोला' किंवा 'जाऊ तिथं खाऊ' किंवा 'बघ हात दाखवून' ची अशी इनोवेटिव प्रसिद्धी केली होती का? नाही. गरजच नाही. खणखणीत नाण्याला इतकी टोकाची प्रसिद्धी करायची गरजच पडत नाही.

हे असं निदान १०० गावांच्यात करून झालंय....
हे तुम्ही जे सगळं सांगीतलतं ते वर्तमानपत्रात वगैरे सांगायच्या गोष्टी झाल्या. माझे प्रश्न: तुम्ही कोणत्या गावांत गेला होतात? असा हा 'अर्थपूर्ण' सिनेमा कुठला? माझ्या गावात येता का असा खेळ आयोजित करायला? तिथे २ अतिशय सुस्थितीतली थिएटर्स आहेत. किंवा दुसऱ्या एखाद्या गावात चलता का? तुमच्या या चित्रपटाचा व्यवसाय किती? पुण्यात तुमचा हा चित्रपट कुठल्या थिएटर्सना आणि किती आठवडे चालला?

तुम्ही किती सिनियर किंवा मी किती ज्युनियर हा मुद्दा इथे नाहीये. आणि ते अधोरेखित करायचा प्रयत्नही करू नका...
मी तसे अजिबात अधोरेखित करत नाहीये. मी सीनियर आहे असे ही मी म्हणत नाही. कदाचित तुम्हीच माझ्यापेक्षा ज्ञानाने, मानाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहात. मी फक्त माझा अनुभव सांगत आहे इतकेच. आणि तुमच्या सारखा 'प्रवाहांचा अभ्यास' वगैरे पण मी काही केलेला नाही. मी अभ्यासापेक्षा अनुभवांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. अनुभवातून जे शिकता येतं ते अभ्यासातून शिकता येत नाही.

वैयक्तिक पातळीवर उतरायची गरज नाही.
तुमच्या अगदी पहिल्या प्रतिसादाकडे एकदा नीट बघा. वैयक्तिक पातळीवर आधी तुम्ही उतरलात हे लक्षात ठेवा. आणि नुसतं उतरलात असे नव्हे तर अगदी उद्धट आणि हिणकस भाषेतून तुम्ही ही पातळी गाठलीत. मी काही तुम्हाला उद्देशून हा लेख लिहिला नव्हता मग असल्या भाषेत प्रतिसाद द्यायची काय गरज होती? चर्चा ही चर्चा म्हणून करायची असते. त्यात मुद्दे मांडायचे असतात आणि शांतपणे ऐकूनही घ्यायचे असतात. आतातायीपणा करून वाट्टेल त्या भाषेत आपले मतभेद मांडायचे नसतात. निदान 'आशयगर्भ', 'अर्थपूर्ण' चित्रपटवाल्यांना हे सांगायची गरज पडू नये.

उद्धट आणि हिडीस? तुम्ही वरच्या लेखात जे दावे केलेत ना ते खरंतर त्या प्रकारचे आहेत.
काय कुठल्या प्रकारचं आहे हे महाराष्ट्रातील मराठी चित्रपटांची दुरवस्था आणि इथे असणाऱ्यांचे प्रतिसाद यावरून स्पष्ट होत आहे. मी माझ्या लेखात जे खरे आहे, जे आम जनतेला वाटते तेच लिहिले आहे. तुम्ही नाकारलतं म्हणून सत्य बदलत नाही. आणि चर्चेचे काही संकेत असतात, नियम असतात. हा वैयक्तिकरीत्या तुम्हाला उद्देशून लिहिलेला लेख नाही. तुम्ही कोण आहात, तुमचा चित्रपटांशी संबंध आहे वगैरे मला माहित ही नाही. मग इतके मनावर घ्यायचे कारणच काय?

चर्चा या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणता ते संपूर्ण सत्य असा होतो का? तुमच्या सगळ्या विधानांच्या संपूर्ण विरोधी जाणारे अनुभव आणि निष्कर्ष माझ्याकडे असताना तुम्ही मला नवीन रक्त म्हणून उडवून लावताय आणि चर्चेच्या बाता करताय! व्वा!!
मी असा दावा केलेला नाही. मी माझी मतं, माझे विचार, जे सर्वसामान्य लोकांच्या मतांवर, त्यांच्याशी होणाऱ्या माझ्या संवादावर, त्यातून कळणाऱ्या त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आधारलेले आहेत, फक्त तेच मांडले आहेत. शिवाय कुणालाही वैयक्तिक लक्ष्य करून हा लेख लिहिला नव्हता. मग जर तुमचा पहिला प्रतिसाद जर अतिशय उद्धट भाषेत असेल आणि तो ही वैयक्तिक पातळीवर उतरणारा, संतापजनक आणि चीड आणणारा असेल तर चर्चेचा अर्थ नीट कुणाला कळला नाहीये हे इथेच स्पष्ट होते.

'मराठी चित्रपट चालत नाहीत', 'मराठी चित्रपटांवर कायम संकट असते', 'मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत नाही' ह्या सगळ्या फॅक्टस आहेत. आणि मोजके अपवाद वगळता मराठी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत नाही हे देखील सत्य आहे. त्याची कारणे, जी मला माझ्या अनुभवातून, लोकांशी बोलून, त्यांचा कल बघून कळलेली आहेत, ती या लेखात मांडलेली आहेत. या सगळ्या फॅक्ट्सना इथे सगळे सहमत देखील आहेत. अजूनही आमच्या गावात ९०% लोकांना 'श्वास' नावाचा सिनेमा आला होता आणि त्या चित्रपटाने इतिहास रचला हे माहित नाही. अगदी मोजक्या म्हणजे बहुधा ०.५% लोकांनी तो बघितला असावा. त्यात हे सगळे असे ज्यांनी नोकरीखातर, शिक्षणाखातर गाव सोडले आहे आणि पुण्या-मुंबईची वाट धरली आहे. आमच्या गावात किंवा आस-पास देखील हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही कारण वितरकांना माहित आहे की अशा गावांमध्ये अशा चित्रपटांचे भवितव्य अंधकारमय असते. थोड्या-फार प्रमाणात पुणे-मुंबई-नाशिक वगैरे शहरी भाग वगळता मराठी चित्रपटांची अशीच अवस्था आहे. विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खांदेशातल्या कित्त्येक ठिकाणी मराठी चित्रपट बघणे म्हणजे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय समजतात. हे वास्तव आहे आणि केवळ डोळ्यांवर हटवादीपणाची पट्टी बांधून ते बदलणार नाही.

--समीर