मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट पहावेसे वाटत नाही हेच एक सत्य आहे. चित्रपट चांगला असो वा वाईट... केवळ तो मराठी आहे म्हणून न पाहणारे लोकच जास्त आहेत. अगंबाई अरेच्चा, पक पक पकाक, कायद्याचं बोला, जाऊ तिथं खाऊ तर चांगलेच होते. तरीही त्यांना हिंदी चित्रपटांच्या तुलनेत महाराष्ट्रात माफक यश मिळाले असेच म्हणावे लागेल. यापैकी कोणत्या चित्रपटासाठी तुम्हाला ब्लॅकने तिकिटे घ्यावी लागली आहेत?
अगदी वर उल्लेख होत असलेल्या श्वासचे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून जाहीर होईपर्यंत असा चित्रपट आहे हे किती लोकांना माहिती होतं? तो ऑस्कर एंट्री जाहीर होण्यापूर्वी किती लोकांनी तो पाहिला होता?
जत्रा, गोलमाल, इश्श्य, यंदा कर्तव्य आहे, खबरदार, सरीवर सर, मातीच्या चुली, जबरदस्त, जितेंद्र जोशी आणि नवीन प्रभाकर जोडीचा एक चित्रपट (त्याचं नाव आठवत नाही) या मनोरंजक (किंवा बिनडोक) चित्रपटांमध्ये असं काय नव्हतं जे आप का सुरुर आणि पार्टनर यांमध्ये आहे? मग आप का सुरुर आणि पार्टनर हिट होतात मात्र हे चित्रपट कधी आले कधी गेले हे देखील कळत नाही असं का? सध्या येणाऱ्या मराठी चित्रपटात अगदी आयटम साँग देखील असतं हे तुम्हाला माहिती आहे का?
एका वर्षी १०० मराठी चित्रपट आणि १ हिंदी चित्रपट असे रिलीज झाले तरी तो एकमेव हिंदी चित्रपट सुपरहिट होईल आणि साडे नव्व्याण्णव मराठी चित्रपट सडकून आपटतील यात शंका नाही. प्रभातमध्ये २५ आठवडे पूर्ण केल्यावर सकाळमध्ये उरलेल्याची बातमी येईल... मनोगतावर ती प्रसिद्ध होईल आणि मग आपण आपली पाठ थोपटून घेऊ.