नावे ठेवायची नाहीत पण मराठी चित्रपट प्रगतीत हिंदी चित्रपटांच्या १०-१५ वर्षे मागे आहेत.(म्हणजे आता हिंदी चित्रपटांनी फक्त आयटम गाणी आणि नाच यावर भर देऊन पुढे येणे सोडले आहे हा मुद्दा सोडा.)
माझ्या लहानपणी दूरदर्शनवर शनिवारी संध्याकाळी मराठी आणि रविवार संध्याकाळ हिंदी सिनेमे लागायचे. हिंदी सिनेम्या आधी लोक स्वयंपाक वगैरे आवरुन संचासमोर बसायचे. मराठी आपला येता जाता डोकावून पाहिला जायचा. आता आता वेगळे आणि चांगले मराठी सिनेमे गेल्या १० वर्षात निघायला लागले. त्यापूर्वी काय होते? पाटील, तमाशा, शेतकरी, त्याच्या बायकोवर पाटलाची नजर अशा ठराविक साच्यातले किती आले आणि गेले?त्यानंतर नाक वाहेपर्यंत रडवणाऱ्या आणि शक्यतो सुनेचा छळ या कथेची लक्ष्मणरेषा न ओलांडणाऱ्या कथा. नंतर काय आले? लक्ष्या अशोक या नाण्यांवर काहीही चालेल म्हणून सरळ सरळ इंग्रजी हिंदी चित्रपट ढापून बनलेली खिचडी.
हिंदी चित्रपट टुकार आणि कायम लॉजिकला सोडून असले तरी कथेची विविधता त्यांच्यात थोड्या आधीपासून आहे.
मराठी सिनेमाला बहरायला थोडा वेळ दिला पाहिजे. आता कुठे थोडाफार शहरी क्लास क्राउड तिकीटे काढून मराठी चित्रपट बघायला लागला आहे. चांगले चित्रपट येत आहेत.
माझ्या विधानात चूक असल्यास किंवा कोणाचा अपमान झाल्यास क्षमा. चित्रपटांचा माझा अभ्यास नाही तरी सामान्यज्ञानावर ही पिंक टाकली.