आपण 'धर्म' हा शब्द प्रचलित अर्थाप्रमाणे घेतला आहे. पण ज्यांना आज आपण सरसकट धर्म म्हणतो ते फक्त (असलेल्या अथवा नसलेल्या) ईश्वराचे उपासना मार्ग आहेत.
त्यामुळे ''धर्म'' शब्द निरर्थक आहे असे म्हणणे धाडसाचे वाटते.
असो. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असे दिसून येते की जीवनविषयक तत्त्वज्ञान अशीही धर्माची व्याख्या आहे.
आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य एतत पशुभि: नराणाम।
धर्मोहि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीन: पशुभि: समान: ॥
जगण्यासाठी मानव आणि पशू सर्व गोष्टी समान करतात पण मानव त्या सर्व गोष्टी योग्यप्रकारे विचार करून करू शकतो (आपला मानवधर्म पाळू शकतो) असे म्हटले आहे. हा कृतीवरचा विचारांचा अंकुश म्हणजेच धर्म होय. धर्म माणसा-माणसात फरक करण्यासाठी नसून पशू आणि माणसात फरक करण्यासाठी आहे. त्यासाठी ईश्वराला मानलेच पाहिजे किंवा त्याची उपासना केलीच पाहिजे असे नाही. कोणताही निरीश्वरवादीही आपल्या सदसदविवेकबुद्धीला नाकारून वागला तर त्याने मानवधर्म त्यागला असेच म्हणावे लागते.
आपण आपले जीवन कसे जगावे याबाबत काही मूलभूत सिद्धांत सर्वच उपासना मार्गांनी मान्य केलेले आहेत. सर्वसामान्य माणूस मात्र हे सिद्धांत बाजूला ठेवून माझा ईश्वर तेवढा कसा खरा आणि तुझा कसा खोटा, माझा मार्गच कसा श्रेष्ठ आणि तुझा निम्न या भांडणात गुंतलेला आहे. ज्यांनी आपला संप्रदाय बदलला त्यांनी फक्त त्यांचा ईश्वर/उपासना मार्ग बदलला. विचार आणि वर्तन नाही.
तो माणसाचा दोष आहे - धर्मांचा नाही. त्यामुळे धर्माचा अभिमान जरूर बाळगावा पण तो आदर्श जीवन जगण्याच्या पद्धतीचा - या अर्थाने. उपासना मार्गांचा नव्हे. सरसकट धर्म या शब्दाला वेठीला धरण्यात काय हशील?
आता खरी गरज आहे ती सर्व जुन्या संप्रदायातील उत्कृष्ट विचार एकत्र करून नवा जागतिक धर्म बनवण्याची. काऱण सामान्य माणसाला अशा सामाजिक/मानसिक आधाराची गरज असते. (डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म(?) स्विकारला. काऱण ते कितीही बुद्धीप्रामाण्यवादी असले तरी त्यांच्या असंख्य सर्वसामान्य अनुयायांना धर्महीन रहाणे ही कल्पना समजली नसती - पटली नसती.) सांप्रदायिकता ही संकल्पना मोडीत काढणे आजतरी अशक्य आहे. मानवाची जाणीव अजून तेवढी प्रगल्भ झालेली नाही.
पण अजून तरी आपापल्या संप्रदाय संकल्पनांच्या बाहेर ( आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन, सर्व तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास करून आणि अनन्वित हाल अपेष्टा सोसून नवा सर्वसमावेशक धर्म बनवणारा कोणी मानव निर्माण झालेला दिसत नाही. काऱण माझ्याप्रमाणेच सर्वांची बोटे दुसऱ्याकडे रोखलेली आहेत.