वस्तुत: आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ हा मुद्दा किंवा विषय अधिक विचार प्रवण आहे. त्यावरच साधक बाधक चर्चा झाली तर ते  हितावह होईल असे मला वाटते. इथे, मूल जन्मण्यापूर्वी किंवा जन्माला आल्यानंतरही, त्याच्या बौद्धिक विकासावर सभोवतालच्या वातावरणाचा तदनुषंगिक दृक् श्राव्य परिणाम होत असतो यात कांही दुमत नाही. मात्र विचारात घ्यावा असा प्रश्न असा आहे की बौध्दिक वाढ व्हावी म्हणून कांही पालक डीवीडी/व्हिडिओ टेपस् यांचा वापर करतात,  ते कितपत योग्य आहे? 
       गर्भ किंवा शिशु अवस्थेत बालक यथोचित ध्वनि संस्कार ग्रहण करू शकते. या विधानाच्या पुष्टीसाठी दरवेळी अभिमन्यूचाच दाखला द्यावा अशी गरजही नाही. कारण असे झालेले संस्कार आपण प्रत्यही पाहात असतोच. मंगेशकर कुटुंबात संगीताचा नित्य संस्कार होत असे. त्याचा त्या कुटुंबातील बालकांवर झालेला संस्कार आपण पाहात आहोतच. मात्र असे संस्कार व्हावे म्हणून केवळ जन्मदातेच नव्हे तर घरातील अन्य कुटुंबियांनीदेखील सुसंस्कार घडतील असे वातावरण जोपासणे गरजेचे आहे. ज्या घरांत नित्य पूजाअर्चा, प्रकट पठण, सुमधुर संगीताची गायन-वादन, साहित्य कला आदि विषयांची प्रकट चर्चा असे वातावरण असते, त्या घरांतील बालके आपोआपच सुसंस्कारित होतात हा अनेकांचा अनुभव आहे.  यासाठी  
डीवीडी/व्हिडिओ टेपस् यांचा वापर करावा किंवा नाही हे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे ठरवावे लागेल. मात्र त्यातील दुष्परिणांमाचा विचार करणे अत्त्यावश्यक आहे. शिवाय त्यात एक प्रकारची कालबद्धता आली. त्यापेक्षा मूल आजुबाजूला खेळत आहे, आई बडबडगाणी किंवा एखादे स्तोत्र गुणगुणते आहे, आजी-आजोबा नातवंडाला खेळवतांना अशाच कांही सुसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगत आहेत, कांही प्रकट वाचन करीत आहे, अशा प्रकारचे संस्कारक्षम वातावरण मुलाच्या बौद्धिक विकासाला पूरक होईल.