सुदैवाने भारतामध्ये बीट, तांबडा भोपळा, पालक आणि इतर पालेभाज्या खूप स्वस्त आहेत. भाकरीशी तिखट चटणी आणि कांदाच खाण्याची अजिबात गरज नाही. ज्या भागात उन्हाळ्यात पालेभाज्या मिळू शकत नाहीत अशा भागात भोपळा नक्की मिळतो. भोपळा न कापता ठेवला तर अनेक दिवस टिकतो असे म्हणतात.
जनुकबदल केलेली धान्ये वापरण्यात धोका असण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्याचे बियाणे दरवर्षी भरपूर पैसे देऊन परदेशी कारखानदारांकडून विकत घ्यावे लागेल. पीक न आल्यास (ही शक्यता विचारात घ्यावीच लागेल) शेतकरी बुडालाच. सुधारित बियाणे भले पीक जास्त देत असेल, औषध फवारणी केल्यावर किडीचा सामना करू शकत असेल किंवा शेतात लवकर तयार होत असेल पण ते चवदार नक्की नसते. उगीच नाही आपल्याकडे गावरान शेंगा, गवार, मटकी, वांगी--फार काय गावरान देशी अंडी यांना जास्त मागणी असते.