अनंत मनोहर व 'राब' ह्याबद्दल मी बरेच काही स्तुतिपर वाचून आहे. कधीतरी जमेल त्याप्रमाणे ही कादंबरी व इथे इतर मनोगतींनी उल्लेखिलेले त्यांचे इतर साहित्य वाचीन असे म्हणतो.
पण चौकस नेहमी नेमके व साहित्याबद्दलच्या खोल जाणीवेने लिहिणारे आहेत. त्यांचे लिखाण असे असते की आपसूकच आम्ही दाद देणारे प्रतिसाद लिहीतो. 'मी दमदार लिहीतो, तुम्हाला कळत नाही का?' असे विचारण्याची पाळी त्यांच्यावर येत नाही. इथे मात्र त्यांनी पार निराशा केली आहे असे खेदपूर्वक म्हणावे लागते.
एखादी कादंबरी प्रादेशिक आहे, हा तिचा एक गुणधर्म आहे हे ठीक आहे. पण त्यात तिचे खास सांगण्यासारखे वेगळेपण असे काही नाही. तसे सांगायचे झाले तर एस. एम. काशीकरांच्या सगळ्या कादंबऱ्या मुंबईच्या परिसरात घडल्या होत्या, हा त्यांचा 'वेगळेपणा' म्हणून उल्लेखावा लागेल. वेगळेपण सांगताना दिलेला दुसरा मुद्दा (मराठा जातीचे नायक व परिवार, पण पारंपरिक मराठा वर्णने नव्हेत, बरं का), हे तर हास्यास्पद झाले. एखाद्या साहित्याचे चांगलेपण सांगताना कायकाय कसोट्या लावणार आहोत आपण? आय. टी.तला नायक व नायिका, पण लोकहो, नेहमीप्रमाणे 'जावा' अथवा तत्सम कामे करणारे नव्हेत हो, हे अजून वेगळेच काही हाताळतात, उदा. ग्राफिक्स, असे दाखवले आहे! पाचवे आणि सहावे मुद्दे असेच-- पाचवा मुद्दा एव्हढाच की कादंबरी बटबटीत नाही. आणि सहावा हा, की काही उगाच मसाला भरलेला नाही. (इथे तर चौकस चक्क बॅकफूटवर गेले आहेत असे वाटते).
हे सगले लिहिणे कमी झाले असे स्वतःलाच वाटल्याने शेवटी तर चौकसांना सरळ ब्लर्बच उर्धृत करावेसे वाटले.
चौकसांची साहित्याची जाण व इथले त्यांचे लिखाण ह्यामुळे त्यांच्याकडून सखोल परिचयाची अपेक्षा आहे, म्हणून केवळ हे लिहिले.