हॅरी इंग्लंडातच जन्मला आणि त्याची कर्मभूमी ही इंग्लंडातच आहे. पण त्यावरचे चित्रपट मात्र अमेरिकेत जन्मले. अर्थात हॅरीचे जन्मस्थान हा मुद्दा गौण आहे. महत्त्वाचा भाग असा आहे की या मुलाने आबालवृद्धांना इंटरनेट आणि टेलिव्हिजनच्या मायाजालातून काही काळापुरतं का होईना खेचून बाहेर काढलं आणि कागदी पुस्तकाचा मुद्रित पानांमधल्या या अद्भुतरम्य जगाची मोहिनी घातली.
मात्र हॅरी पॉटर जितका पाहिला गेला तितका वाचला गेला नाही या मताशी मात्र मी असहमत आहे. त्या विषयावरचे चित्रपट हे पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर कितीतरी काळाने आले. शिवाय पुस्तकातला सगळा तपशील चित्रपटांमधे दाखवता येत नाही आणि चित्रपट दिग्दर्शक काही वेळेला पदरच्या घटना कथानकात घुसडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय झालं ही उत्सुकता शमवण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहाणे हे हॅरी भक्तांना पटणारे नाही. त्यामुळे पुस्तकांच्या दुकानांच्या बाहेर रांगा लावून ही पुस्तके विकत घेणारे आणि ती वाचणारे कोट्यवधी लोक जगात अहेत. पुस्तके वाचल्यानंतर चित्रपट बघण्यास काही हरकत नसावी.
मला वाअतं, गणपती, किंवा हनुमान किंवा श्रीकृष्ण हे आपले परंपरागत नायक आहेत. किंबहुना वयाच्या सर्व वळणांवर ते आपल्या सोबत असतात, आपल्यालाला प्रेरणा, रंजन, बळ, स्फूर्ती आणि इतर बरंच काही देत असतात. माझ्या आई-बाबांच्या पिढीपर्यंत या व्यक्तिमत्त्वांची तोंडओळख बालपणी होत असे आणि कॉमिक्स किंवा चित्रफितीयुक्त पुस्तकांमधून त्यांची निराळी ओळख घडवून आणायची तितकी गरज नव्हती. शिवाय कॉमिक्स हीरोज ना असलेलं एक प्रकारचं चकचकीत वलय या देवतांना लावायची तशी गरजही कोणाला वाटली नाही.
आज मात्र वयाच्या दुसऱ्या वर्षापासून स्कूबी डू पासून ते रिची रिच, पोकीमन ते अगदी एक्स मेन पर्यंत सगळी कार्टून्स तोंडपाठ असलेल्या पिढीला या देवतांची ओळख करून देण्यासाठी ऍनिमेशन तंत्राची मदत घ्यायची वेळ आली आहे. या देवता मंडळींच्या बाललीला मुळातच इतक्या सशक्त आहेत की ऍनिमेशन तंत्राने त्या सादर केल्यावर त्या अधिक आकर्षक आणि रंजक वाटू लागतात. या प्रक्रियेचं पहिलं पाऊल बहुधा अमर चित्र कथांमधून पडलं असावं. मला वाटतं नवीन पिढीला त्यांच्या पर्यंत पोचवण्याचा हा मार्ग स्तुत्य आहे आणि त्यांच्या देवत्वासकट ते नवीन पिढीपर्यंत पोचले तरी काही बिघडत नाही. चांगल्या कलाकृतींना देशकालाच्या सीमा नसतात. अमेरिकेमाधे सध्या रामायणकथा कॉमिक्समधून अतिशय लोकप्रिय होत असल्याचं अलिकडेच वाचनात आलं होतं. त्यामुळे मला वाटतं की या देवकथा जगभर जरूर जाव्यात पण त्यांच्या देवत्त्वासहित गेल्या तर अधिकच चांगलं.
--अदिती