कोकणातल्या श्रावणाचे अतिशय सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे. लेख काव्यात्म आहे. अभिनंदन.
एक जरा खटकले. कोकणातील श्रावणाचे वर्णन करताना मुंबईच्या श्रावणाचा कमअस्सल दर्जा रंगविणे गरजेचे होते का? ते वर्णन कोकणातल्या श्रावणाच्या सौंदर्याला उठाव देण्यासाठी आवश्यक होते, असे मला वाटत नाही. कोकणातल्या श्रावणाचे सौंदर्य कोणाशीही तुलना न करता अप्रतिमच आहे.
मुंबईतल्या श्रावणाची छटा मुंबईवर आजूबाजूला उमटत नाही. श्रावणाचा पहिला दिवस काही फारसं वेगळं रूप घेऊन येतो, असं इथल्या सिमेंटच्या जंगलात आजवर कधी जाणवलेलंच नाही. नेहमीचाच दिवस, कामाची गडबड, ट्रेनची गर्दी, बसच्या रांगा आणि डबे-पिशव्या सावरत गाडी पकडण्यासाठीची धावपळ... बारा महिन्यांच्या या कसरतींनी श्रावणाच्या या सरीचं अवघं अप्रूप खरं म्हणजे कधीचंच धुवून टाकलेलं.
ह्याला कारण वास्तव्य मुंबईत असलं तरी मन अजूनही कोकणातच आहे. तुमचा दोष नाही. सर्व कोकणवासीयांची हीच खोड असते. पुरूषांनी नोकरी व्यवसायासाठी कोकणाबाहेर पडायचं, मुलींनी सासर निवडताना मुंबई-पुण्यासारखं शहर निवडायचं आणि कायम 'आमच्या कोकणात.....' हा राग आळवायचा. आपल्या जन्मगावाचा, प्रदेशाचा अभिमान जरूर असावा पण जिथले वास्तव्य आपण स्वीकारले आहे त्याचा दुस्वास करू नये. तिथली सौंदर्ये टीपण्याचा प्रयत्न करावा. अगदी कोकणासारखं निसर्ग सौंदर्य कदाचीत मुंबई आढळणार नाही पण म्हणून मुंबईच्या निसर्गाला सौंदर्यच नाही असा सूर लावू नये.
शेजारच्या काकूंकडे अभ्यंगस्नान करून नंतरचे वाटीभर दूध-गूळपोहे रिचवत दक्षिणेपोटी मिळालेली पावली खिशात मिरवताना, आपल्या कमाईचा आनंद मी शाळाभेर उधळायचो
हेच मुंबईत राहून मीही लहानपणी अनुभवले आहे.
श्रावणाच्या त्या दिवसांतच बहुधा ऑगस्टही उजाडलेला असायचा... पंधरा ऑगस्टच्या प्रभातफेरीची आणि झेंडावंदनाची तयारी आणि प्रत्येक दिवसाच्या व्रतवैकल्यामुळे घरात साजरा होणारा श्रावणसण सगळ्या घरावरच उत्साहाचा गालीचा पसरायचा.
खरं आहे. मुंबईत (बरं का.... मुंबईत) आमच्या घरात (आणि शेजारीपाजारीसुद्धा) शुक्रवारची कहाणी, जीवतीची पुजा, रविवारची कहाणी, सोमवारची कहाणी आणि देवीदेवतांच्या पुजा आमची आई अगदी ठेवणीतील नऊवारी पातळ आणि नथ वगैरे घालून करायची. कधी दूधाचा, कधी गुळ-खोबऱ्याचा तर कधी साटोऱ्यांचा नैवेद्य असायचा. (माझा पुजेतला 'इंटरेस्ट' इतकाच) त्या साठी मी आईने सांगितलेल्या दुर्वा, आघाडा, फुलं गोळा करायला अगदी परडी वगैरे घेऊन जायचो. श्रावणी अमावस्येला 'आतिथ कोण?' असे विचारल्यावर आईच्या मागे उभे राहून 'मी' असे म्हणायचे आणि ती देईल तो नैवेद्य स्वीकारायचा अशी प्रथा होती. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहण्यासाठी दादर चौपाटीवर होणारी गर्दी अजूनही आठवते. गोकुळअष्टमी - दहिहंडी हे तर खास भिजण्याचे, विहिरींमध्ये पोहण्याचे, दांडगाईचे दिवस. ते कसे विसरायचे? पुढे मुंज झाल्यानंतर ती 'श्रावणी' होम- हवन, गोमुत्र आणि गोमय प्राशन (एकदाच केली मी श्रावणी) वगैरे श्रावणातल्या अनेक आठवणी आजही मनात ताज्या आहेत.
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफही सुंदर विणलासे,
मंगलतोरण कुणी बांधीले नभोमंडपी जणू भासे
ही शाळेत शिकलेली कवीता (मुंबईत) प्रत्यक्षात अनुभवायचो आणि हे सौंदर्य टीपलेल्या कवीला मनोमन दाद द्यायचो. आत्ता जोरदार सर आणि पाठोपाठ चकचकीत उन. मन चकित करणारे अनुभव. मुंबईत लोकलने प्रवास करताना सुद्धा, गाडी सिग्नलला उभी असताना, श्रावणातल्या नुकत्याच येऊन गेलेल्या सरी नंतर विजेच्या तारांवर बसलेले, पंख फडफडवणारे, चोचीने पंख साफ करणारे पक्षी, कोवळ्या उन्हात तजेलदार दिसतात. पावसात आडोश्याला बसलेली कोंबडी पाऊस थांबताच लखलखत्या उन्हात ८-१० पिल्लांना घेऊन किडे, दाणे टीपायला बाहेर पडते तीही सुंदर दिसते. शोधाल तिथे सौंदर्य दिसेल.
खिडकीच्या गजाबाहेर हात काढून तळव्यांवर पागोळ्यांच्या धारा झेलायच्या खेळानं मला वेड लावलं...
अगदी हेच आम्हीही मुंबईत राहून केले आहे.
आजही मुंबईत श्रावण माझ्या दारात आहे:
गेले दोनतीन महिने मुंबईत पावसाच्या सरी कोसळतायत... एका पावसाळ्यानं मुंबईच्या काळजात भरवलेली धडकी अजूनही धडधडतेय. पावसाची एखादी सर जरा जास्त वेळ विसावली, की पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या होतात, आणि कधी एकदा ती सर थांबते, अशी अस्वस्थ, मनाला न पटणारी स्थिती मनात घर करते. गावाकडच्या लहानपणीच्या त्या पावसाच्या आठवणी अजूनही मनात सतत बसरत असताना, इथे मात्र, पाऊस थांबावा, असा विचित्र विचार मनाला पोखरत राहातो...
शरीराने (नाईलाजाने) मुंबईत आणि मनाने (हौशीने) कोकणात राहिल्याने असे होते. ज्याने मुंबईत राहून मुंबईवर प्रेम केले, मुंबईचे जीवन मनोमन स्वीकारले, मुंबईला परके नाही तर, आपले मानले त्याला असे वाटत नाही. मुंबईच्या पावसाने माजवलेल्या हाहाःकाराचा त्त्याला विसर पडत नाही पण त्याच्या काळजात धडकी भरत नाही. पाऊस थांबावा असे त्याला (भीतीपोटी) वाटत नाही. तो त्याचा आनंदाने अनुभव घेतो. एखादे तातडीचे काम अडकले म्हणून किंचित खंतावतो पण तेवढेच. लगेच कांदाभज्यांच्या तयारीला लागतो.
असो. तुमचा लेख उत्तमच आहे त्यात वाद नाही. मुंबईला जरा सापत्न भावाने वागविलेत म्हणून माझ्या भावना मांडल्या. राग मानू नये.