माझी आजी आजमितीस 87 वर्षांची आहे. माझ्या मनात तिच्या विषयी अत्यंत प्रेम आणि भक्ती आहे. जीवनात जितक्या वेळा कठीण प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येते .. देवाच्याही आधी मला तिची आठवण येते. तिच्या अत्यंत खडतर आयुष्यातले दिवस तिने निव्वळ- देव आपल्या पाठीशी आहे आणि त्याची आपल्यावर कृपा दृष्टी आहे या भावनेने निभावले. तिच्यामुळे माझी देवावर श्रद्धा आहे आणि माझ्या लेकराच्या पाठीवर जेव्हा तिचा हात फिरतो तेव्हा दुनियेतली कोणतीही वाईट शक्ती माझ्या बाळाचं कधीही काहीही वाकडं करु शकणार नाही असं मला वाटतं.‍ तिच्या श्रमाच्या पुण्याईवर अनेक घर तगली, जगली आणि अजूनही तिचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत ही देवाने आमच्यावर केलेली कृपा आहे असं मला वाटतं.