प्रतिक्रिया लिहिणार्या काहींनी अशी 'ल्या'युक्त वाक्यरचना अनुभवलेली नाही असे दिसते. मला आलेल्या एका व्यक्तीगत निरोपामधे असा मुद्द आहे की केल्या, म्हटल्या वगैरे म्हणणे/लिहिणे हे एखाद्या बोलीभाषेत असू शकते.
तुम्हाला जर असा ल्यायुक्त शब्दरचनेचा अनुभव आतापर्यन्त आला नसेल, तर वाचा राजेंद्र प्रधान यांनी 'मुक्रछंद हा छंद आहे का' ह्या सदरामधे लिहिलेली 'छंदबद्ध आणि छंदमुक्त' ही प्रतिक्रिया. राजेंद्र प्रधानांबद्दल कोणताही आकस नाही, केवळ एक उदाहरण म्हणून त्यांचे लिखाण वापरते आहे, केवळ माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी.
त्यांच्या ह्या प्रतिक्रियेमधे 'छंदमुक्त' असा शब्द हल्ली वापरल्या जाऊ लागला आहे', 'त्याचसोबत हेही कबूल करायला हवे की आज छंदमुक्त काव्याच्या नावाखाली अमाप पीक घेतल्या जाते' 'आणि 'Time is a great leveller असे म्हटल्या जाते खरेच आहे' ही वाक्ये आहेत. आता त्यांचे संपूर्ण लिखाण वाचलेत तर असे लक्षात येईल की त्यांना त्यांचे लिखाण प्रभावी शब्दामधे मांडता येते, अर्थात त्याच्याकडे भाषाप्रभुत्व आहे. तरीही एकाच प्रतिसादातील ३ वाक्ये मला दाखवता आली. आता ही त्यांची बोली भाषा आहे का ते मला माहित नाही. ह्याचे उत्तर तेच देऊ शकतील. इतरही काही लोकांच्या बोलण्यामधे, ज्यातील काही जणं हे मनोगती आहेत, असे 'ल्या'युक्त शब्द मी ऐकले आहेत. त्यामुळे मला हा मुद्दा मांडावासा वाटला.