मला वाटते, मर्सिडीजचा तारा हा उल्लेख तिथे अनेक वर्षे असलेल्या त्या युनायटेड मोटर्सच्या लोगोलाच उद्देशून आहे. तो तारा माझ्याही चांगलाच लक्षात आहे, आणि हेही आठवते की तो अगदी सरळच चौपाटीला सन्मुख होता. कवितेत सगळे चौपाटीच्या परिसराचे, तिथे वावरणाऱ्या माणसांचे वर्णन आहे (भेळवाले, गंडेरीवाले, मालिशवाले इ.) त्याचप्रमाणे हा ताराही. तो खूपच ठळक होता, म्हणून तो इथे बळवंतरावांना 'होरा चुकला' हे सांगण्याचे काम करत आहे, एव्हढेच. त्याच्याऐवजी तिथे जर वर्षांनूवर्षे जर (समजा) 'विमल'चा लोगो उभा असता, तर 'विमलचा पोत' म्हणतो, असे कदाचित त्या कवितेत आले असते. थोडक्यात 'मर्सिडीज' च्या उल्लेखात आपण सूचित करत आहात तसे 'पाश्चिमात्य आक्रमणाचा सूचक उल्लेख' वगैरे काही नसावे असे वाटते.

'होरा चुकला'  हे मला वाटते अशा अर्थाने की, स्वातंत्र्याची जी कल्पना टिळकांना अभिप्रेत होती, तिच्यापासून आता आपण कित्येक योजने दूर गेलेलो आहोत. आता आपल्या सामाजिक, राजकिय जीवनात जे नैराश्यपूर्ण वातावरण आहे, ते तसे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना अजिबात अभिप्रेत नव्हते.

वास्तविक सबंध कवितेत जे वर्णिलेले आहे, ते (मला वाटते) काळाच्या पुढे जाण्याने जे काही (कुठल्याही) समाजात नैसर्गिकरित्या होत असते, त्याचे वर्णन आहे. त्यात हळहळ आहे हे कबूल, पण आताच्या सामाजिक, राजकिय अधोगतीचा काही फारसा संबंध नाही. त्यामुळे टिळकांचा होरा चुकला, हे इथे थोडे ठिगळ लावल्यासारखे वाटते.