आपले अचूक आणि मार्मिक रसग्रहण आवडले. 'शौकीन' कॉलेजात असताना प्रथम पाहिला होता व आवडला होता. त्यानंतर आज पर्यंत केबलवाल्याच्या कृपेने अनेकदा बघून झाला आहे. दरवेळी तसाच टवटवीत वाटतो - कदाचित विषय चिरंतन असल्यामुळे असेल. तीनही ज्येष्ठ नटांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत तसेच रती अग्निहोत्रीनेही भूमिकेस न्याय दिला आहे. यात मिथुन मात्र कुठेतरी कमी पडल्यासारखा वाटतो.
आज मात्र विचार करताना असा प्रश्न पडतो की ही समस्या केवळ पुरुषांची आहे का? या चित्रपटात दाखवली गेलेली मनोवृत्ती, भीती, अपराधीपणात लपेटलेली अतृप्ती, हे सर्व पुरुषाइतकंच स्त्रियांनाही लागू होत  नाही का? जरी भारतातील त्या काळच्या सामाजिक वातावरणात हा प्रश्न कोणाला फारसा पडला नसेल किंवा पडला तरी जाहीरपणे उच्चारणे धाडसीपणाचे वाटले असेल तरी आज हा विषय अधिक खुलेपणाने मांडला जाऊ शकतो. मात्र ही चर्चा "भारतीय संस्कृतीवर हल्ला", "भारतीय स्त्रियांचा अपमान" इत्यादी लेबलं न लावता, टाळीची वाक्यं न वापरता शरीरशास्त्रीय व त्याहूनही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केली तरच उपयुक्त होऊ शकेल.