काहीतरी जबरदस्त शीर्षक देण्यात वेगळीच मजा असते. असो.
भुतं असतात की नाही ते माहित नाही. भित्यापाठी ब्रह्मराक्षस मात्र हमखास असतो.
गेल्या हिवाळ्यातील गोष्ट. मध्यरात्र झाली की आमच्या मास्टर बेडरूमच्या भिंतीवर जोरजोरात बुक्के हाणल्याचा आवाज येई, एका ठराविक इंटरवलने ३-४ तास हा प्रकार चाले. बरेचदा पहाटेपर्यंत हा आवाज येत असे. नेमकी कोणती भिंत ते कळत नसे. इतर खोल्यांत मात्र (स्मशान)शांतता असे. काही बर्फाच्छादित रात्रींत घराबाहेर जाऊनही कानोसा घेतला पण शांतताच!!!
शेजारी रात्रीबेरात्री काहीतरी दंगा करतात का म्हणून एकदा त्यांना विचारले तर ते म्हणाले आमच्याही मास्टर बेडरूममध्ये असाच आवाज येतो. आम्हाला वाटायचे की तुम्ही घरात काहीतरी करता. या गोष्टीची आम्ही रीतसर तक्रार इ. केली. ही गोष्ट ज्यांना माहित झाली त्यांनी लगोलग, कोणताही वेळ न दवडता इथे भुताटकी असावी असा निष्कर्ष काढला. आमचे शेजारी घर बदलायलाही निघाले होते. दोन-तीन महिने हा त्रास झाला, नंतर अचानक आवाज बंद झाला.
सध्या हिवाळा सुरु होण्याची वाट पाहते आहे.
किस्सा सत्य आहे पण भुताटकी असेल यावर विश्वास नाही.