फाटे फुटू नयेत या अपेक्षेने लिहिलेल्या मी लिहिलेल्या प्रतिसादामुळेच फाटे फुटत असल्याचे माझे मत झाल्याने, मी माघार घेत आहे. माझ्या मत व्यक्त करण्यामुळे कोणाचाही मत व्यक्त करण्याचा अधिकार हिरावला जावा, असे मला वाटत नाही. आणि, `त्या अनेकांत आपण बसत नाही', हे मा. चित्त यांनी स्वतःच सांगितल्यामुळे माझ्या मनात रुजू पाहणारा समजही दूर झाला. खोडसाळपणाशी नम्र असहमती. `ते'. वाक्य संदर्भ सोडून वापरले असे नाही, त्याचे संदर्भ इथे जोडले इतकेच.
आता मुद्दा हिरीरीने बाजू मांडण्याचा! केवळ एक रसिक म्हणून मी या प्रांतात फेरफटका मारते, आणि, चांगल्या, मनाला सुखावणाऱ्या, साहित्याचा रसिक म्हणूनच आस्वाद घेते. (फ्लॉवरपॉट मध्ये मांडलेल्या एखाद्या सुंदर फुलांला मोहक सुगंध नसेल, तर ती फुले विद्रुप ठरत नाहीत.) मी समीक्षकाच्या गोतावळ्यातली नसल्याने, हीरीरीने बाजू मांडून, काव्यात `लपलेला' आशयगर्भ अर्थ शोधण्यात आणि त्याभोवतीच्याच वादात मला रस नाही. (माझ्यासारखे आणखीही अनेक असतील.) त्यामुळे, आस्वाद घेताना, साहित्याची चिरफाड करणे मला जमत नाही. (हेही माझे माझ्यापुरते मत आहे. कदाचित, निखळ `वाचक-रसिक' याशी सहमत होतील.) यावर समीक्षकांत वाद होतील की नाही, मला माहित नाही. झालेच, तर त्यांनी त्याचा आखाडा स्वतंत्र ठेवावा, आणि केवळ निखळ आस्वाद घेताना सामान्य वाचकाने बनविलेल्या स्वतःपुरत्या मतानंतर या वादामुळे तो पुन्हा संभ्रमित होउ नये, असे माझे नम्र मत आहे. मनोगत हे साहित्यरसिकांच्या सौहार्दाचे केंद्र व्हावे, असे वाटते, त्यामुळे, चित्त यांच्या परखड मतस्वातंत्र्याच्या आग्रहाबद्दल मी सामान्य वाचक म्हणून असहमत आहे. केवळ मूठभर समीक्षकांच्या समीक्षेमुळे नव्हे, तर असंख्य सामान्य रसिकांच्या प्रेमामुळेही अनेक कवी-साहित्यिकांना मान्यता प्राप्त झाली आहे, असे `माझे' मत आहे. याच्याशी कुणाचेही दुमत असेल, तर ते त्याचेत्याचे मत मानावे. त्यामुळे, यापुढे या वादात स्वतःला पाडून घेण्यात मला रस नाही. मी आपलं चांगलं ते केवळ वाचून आनंद मानेन.