मला वाटते, मला वाटतं, केले जाते, केल्या जातं

वरदा, माझ्या लिखाणाबद्दल आपला (अप्रत्यक्ष का होईना) अभिप्राय वाचून आनंद झाला.  परंतू "म्हटल्या जाते, केल्या जाते" ही माझी बोली भाषा नाही (मी वर्‍हाडी माणूस). तरीही मी तसे लिहिले हे खरे आहे.

प्रश्न वर्‍हाडी किंवा कोकणी अशा बोली भाषांचा नसावा. ग्रांथिक भाषेत आपण लिहितो (निदान लिहायला हवे) एका प्रकारे, आणि तीच वाक्ये बोलताना मात्र वाटते च्या ऐवजी वाटतं असे बोलतो. त्यात काही चूकही नाही.

ह्यांनी सांगितलेप्रमाणे काम केले हे छापलेले वाक्य कदाचित चालून जाईल. पण बोलताना सांगितल्याप्रमाणे असेच बोलले जाईल. असे काही कारण तर नसावे? मला नक्की सांगता येणार नाही. [बारावीला ग्रेस मार्क्स मिळवून मराठी विषयात काठावर पास झालो. तेव्हापासून मराठी हा विषय म्हणून सुटला. अभियांत्रिकीसाठी भाषा विषयाचे गुण मोजत नाहीत हे किती छान!]

इथे मनोगतावर लिहिताना आपण "लिहीत" आहोत ही भावना असते आणि सोबतच "गप्पा करणे" हेसुद्धा मनात असतं (असते?). त्यामुळे माझ्या त्या लेखात अशी सरमिसळ झाली असावी.

अर्थात, आपण उपस्थित केलेला मूळ मुद्दा योग्यच आहे. त्यापैकी चूक काय अन बरोबर काय हे जाणून घ्यायची मलासुद्धा इच्छा आहे.

-राजेन्द्र