किती दिवस ' वेदना, प्रेम,चुका, आयुष्य, जीवन, फुले, कळ्या, चंद्र,चांदण्या, राख, स्वप्ने' मध्ये रमणार?
राखेमध्ये, वेदनांमध्ये आम्हांला आमची स्वप्ने दिसतात, प्रेम दिसते, कधीकधी चंद्रचांदण्या किंवा फुले दिसतात, पण त्याचबरोबर त्यातून झेपावणारे फिनिक्सही दिसतात, चुकांमधून सुधारणांची प्रेरणा आणि बऱ्यावाईटाचे अनुभव मिळतात. बारमधल्या धुरकट कोपऱ्यातल्या कुठल्याशा टेबलावरच्या ऍशट्रेमधून कधी कोणत्या फिनिक्सचा किंवा प्रेरणेचा जन्म झाल्याचे अज़ून (निदान माझ्या तरी) ऐकण्यात/पाहण्यात आलेले नाही. आम्हांला ज़शी पिसडलेल्या फुलांची दया येते, तशीच त्यांच्या सुगंधाची लज़्ज़त चाखता येते. आज़कालच्या मिस युनिवर्स असोत, हॉ/बॉलीवूडच्या अभिनेत्री असोत अगर कुठल्याशा बारबाला, त्यांच्या उंची पर्फ़्यूम्सचा सुगंध ज़सा बोचतो, तसा आमच्या मोगऱ्याचा, रातराणीचा, बकुळीचा नि गुलाबाचा बोचत नाही. फुलांच्या, कळ्यांच्या, निळ्याहिरव्या समुद्राच्या रंगांची सर काळ्याहिरव्या बाटल्या, फाउंडेशन नि पावडऱी चोपडून भडक केलेले चेहरे यांना येत नसते; आणि पारिजातकाची फुले, पौर्णिमेचे दुधाळ चांदणे, लाटांनी ओलावलेली वाळू यांच्या स्पर्शातली मखमल आम्हांला वखवखलेल्या नज़रा, उत्तान हावभाव आणि फाजील, व्यापारी स्पर्शांतून ज़ाणवत नाही हो, काय करणार! लॉरियलच्या ज़ांभळ्याभडक ओठांमधून अमृतप्राशनाच्या आनंदाची काय हो अपेक्षा करायची आमच्यासारख्यांनी?! आमच्याच एका मित्रवर्यांनी जेव्हा 'धुरामध्ये चुलीच्या गोड हसली पौर्णिमा' म्हटले तेव्हा आम्हांला चुलीवरच्या तव्यावर गरमागरम भाकरीचा चंद्र उमटवणारी आई आठवली होती. आमचा चंद्र भाकरीत असतो, प्रेयसीच्या चेहऱ्याच्या रुपात असतो, तसाच कधी अमावास्येचा, डागाळलेला, शापितही असतो. आमचे चांदणे ज़से शीतल असते, तसेच कधीकधी बोचरेही असते. फोडणीचे दही नि भात, सांडगे मिरची, बासुंदी, पुरणपोळ्या, मसालेभात, ठेल्यावरचे पान अशा मेजवानीनंतर बिघडलेच समजा आमचे पोट, तरी आम्ही सकाळी ६ ते ९ मध्ये माटुंगा-माहीम स्थानकांमध्ये असते तसे त्या अपचनाचे प्रदर्शन भरवत नाही. मनोगतावरील गझलांचे अजीर्ण मात्र तुलनेने बरेचदा कमालीचे तीव्र असल्याचे ज़ागोज़ागी (आणि वेळोवेळी) दिसून आले आहे (ते थांबवण्यासाठी मनोगतावरील गझलीय अतिसारावर अनेकांनी बंद लेखणीचे डीडीटी फवारले, तर बाहेरून दुसरी साथ येथे आयात केली ज़ाते)
सुटलेले पोट, रुसणारी/झापणारी/बदडणारी बायको/प्रेयसी, तिचा खाष्ट बाप, मुलांची शाळा, रात्रीचे जेवण, नोकरी-व्यवसाय, प्रमोशन्स, नवरा/बायकोचा वाढदिवस, वीकेंडचे हॉटेलातले जेवण, न मागता बायकोसाठी आणलेला गज़रा किंवा रविवारच्या दुपारच्या शिवाजी मंदिर मधल्या ऑर्केस्ट्राचे/नाटकाचे तिकीट, तलत महमूदचे एखादे सुंदर गाणे, उच्च शिक्षण नि स्पर्धा-परीक्षा, लोकलप्रवास, कुटुंब, राजकारण, सिनेमा, सचिनची बॅटिंग, विरारच्या नव्या फ़्लॅटच्या वास्तुशांतीचा मुहूर्त या आमच्या वन रूम किचन मध्यमवर्गीय सुखदु:खांनी आणि त्यांनी बरेच काही मोलाचे शिकवून उपकृत केलेल्या आमच्यासारख्यांनी आमच्या आयुष्यात, जीवनात, स्वप्नात, पावसात, चांदण्यात, फुलांत, ऋतूंत नाही रमायचे तर कुठे? उलट असे स्वप्नवत्, रममाण जीवन ज़गणाऱ्यांनी त्या ज़गण्याचेच प्रतिबिंब जिकडे उमटेल तिथे दिलेली दिलखुलास दाद प्रस्तुत सुविधांचा उपभोग घेण्याचे आमंत्रण देण्यापूर्वी सोईस्कररित्या विसरली गेली, याचे राहून राहून वाईट वाटते.