आपण बसने अनेकदा प्रवास करतो. बसमध्ये कसे उभे रहावे, दरवाज्याला लोंबकाळू नये, तिकीटासाठी प्रत्येकाला सुट्टे पैसे देणे कंडक्टरला नेहमीच शक्य नसते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक असतात. मी असे अनेकदा बघितले आहे की चांगली सुशिक्षीत दिसणारी माणसे, इतरांचा जराही विचार न करता वाटेल तशी उभी रहातात, आपल्याकडे सुट्टे पैसे असूनही देत नाहीत. मुळात आपण कुणी आपल्यावर ओरडेल अशी वेळच का आणतात? तसेच अगदी उत्तम आर्थिक स्थिती असलेले लोक, संधी मिळताच विनातिकीटही जातात. जर एखादा विनातिकीट प्रवासी टी. सी. ने पकडला, तर त्या कंडक्टरला मेमो मिळतो.
माझा स्वत:चा अनुभव आहे..दादरला कबुतरखान्याजवळ एक बस स्टॉप आहे. वरळीला जाण्यासाठी तिथे बस पकडावी लागते. सकाळच्या ऑफिसच्या वेळी तिथे अतोनात गर्दी असते. बेस्टचा एक निरिक्षक तिथे लोकांना रांगेत उभा करतो. एखाद दिवस जर तो तिथे नसेल, तर सावळा गोंधळ असतो. ही सगळी माणसं रोजची ठराविक ऑफिसवालीच असतात. म्हणजे सगळी शिकलेली आणि एकमेकांना रोज बसस्टोपवर बघणारी असतात. तरीही जर तो निरिक्षक नसेल तर रांग न लावता बसमध्ये चढताना अत्यंत लाजिरवाणी बेशिस्त दाखवतात, धक्कबुक्की करतात.ह्या सगळ्या 'सो कॉल्ड' उच्च शिक्षित लोकांना रोज रांगेत उभे रहा अशी दरडवणी का करावी लागते?
खरे तर मुंबईमध्ये बेस्टची जी बससेवा आहे त्याला तोड नाही. पण लोकंच अतिशय बेमुर्वत्खोर व बेशिस्त झाली आहेत. कंडक्टरही माणूसच आहे. आपल्या वागण्याकडे अंतर्मुख होऊन बघणे आवश्यक आहे.