बंड्याने लिहिलेल्या सर्व मुद्द्यांशी मी सहमत आहे.
काही लोकांना आपले पुरोगामित्व वारंवार सिद्ध करण्यासाठी हिंदूंना व ब्राह्मणांना नावे ठेवणे जरूरीचे वाटते. असेच लोक या संमेलनाला आक्षेप घेतील अन्यथा ज्यांना आपलं मूळ समजून घ्यायची इच्छा आहे असे काही लोक एकत्र आले तर काय बिघडतं?
एकंदरीत संमेलनाचा कार्यक्रम पाह्यला तर त्यात एकही कृत्य समाजविरोधी नाही.
खरंखरं उत्तर द्या की आपल्या आडनावाचा माणूस भेटला की तुम्हाला पटकन त्या व्यक्तीविषयी आपलेपणा वाटतो की नाही? मग असे अनेक ठिकाणी पसरलेले आपल्या आडनावाचे लोक भेटावेत असं वाटलं तर त्यात चूक काय आहे?
जात पोटजात कुठलीही असो प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. भाषेचा पोत, पद्धती, अन्नपदार्थ अश्या सगळ्या गोष्टींना धरून ही संस्कृती असते. आणि त्याबद्दल अभिमान वाटण्यात गैर काही नाही आणि अभिमान वाटणे म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणेही नाही. प्रत्येक जातीचे हे हेरीटेज (मराठी शब्द सांगा) जतन केले गेले पाहिजे. त्याचे डॉक्यूमेंटेशन (मराठी शब्द..) केले गेलेच पाहिजे. कारण त्यातूनच समाजाचे चित्र उभे रहाणार असते.
अजून एक म्हणजे लग्नबंधने. जर अमुक तमुक समाजाचा वधूवर मेळावा तुम्हाला खटकत नाही तर चित्पावन महासंमेलन पण खटकता कामा नये. कारण आपल्या जातीतच लग्न व्हावे अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काही नाही. इथे हे नमूद करते की मी स्वतः हा मुद्दा महत्त्वाचा मानला नाही लग्न करताना पण म्हणजे जे हा मुद्दा महत्त्वाचा धरतात ते चूक असं मुळीच नाही. तेव्हा काही जणांचा तो हेतूही असू शकतो.
जर अश्या प्रत्येक मेळाव्याबद्दलच हरकत असेल तर ठिक आहे पण केवळ चित्पावन महासंमेलनावरच आक्षेप असेल तर तुमच्या बोलण्यात काडीचाही अर्थ नाही एवढेच म्हणले पाहिजे. तरीही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. (मी जन्माने चित्पावन असले तरी संमेलनाची कार्यकर्ती नाही पण तरी...)
>>१. चित्पावनांच्या यादीमधील आडनाव असलेले बरेच लोक जातपात मुळीसुद्धा मानत नाहीत, रोजच्या व्यवहारातल्या कोठल्याच बाबतीत धर्म, भाषा, प्रांत वगैरेवरून ते भेदभाव करत नाहीत. सगळे पदार्थ मनमोकळेपणाने खातात व पितात. आजच्या परिस्थितीत ते स्वतः तरी 'चित्पावन' अशी वेगळी ओळख करून देण्यास उत्सुक आहेत काय?<<
रोजच्या व्यवहारात जातपात न मानणारे, सर्व काही खाणारे पिणारे आणि कोकणस्थ म्हणून जन्माला आलेले सर्वच लोक कितीही काही म्हणलं तरी जातीची म्हणून काहीतरी वैशिष्ठ्ये असतात ती घेऊन तरी जन्माला आले असतात (उदा. घारेगोरेपण, तिरकस बोलणं) किंवा त्या त्या संस्कृतीत वाढण्याने त्यांच्यावर काही ठराविक संस्कार झालेले असतात. आता ज्यांना या वैशिष्ठ्यांच्याबद्दल अभिमान आहे ते स्वतःची ओळख चित्पावन म्हणून करून देण्यास उत्सुक असतील ज्यांना नाही ते नाही.
>>२. या कारणामुळेच आंतर्जातीय, आंतरधर्मीय व आंतर्देशीय विवाह करण्यात चित्पावन आडनांवांचे लोक आघाडीवर दिसतात. बिगरचित्पावन पुरुषांबरोबर लग्न केलेल्या महिला किंवा चित्पावन पुरुषांबरोबर लग्न करून आलेल्या स्त्रिया आणि हा मिश्रविवाह केलेल्या दांपत्यांची संतती या महासंमेलनात भाग घेऊ शकतील काय?<<
चित्पावन पुरूषांशी लग्न केलेल्या बिगरचित्पावन स्त्रिया व त्यांची संतती ही पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे चित्पावनच गणली जाते. (हे फक्त चित्पावन जातीत नसून भारतातल्या प्रत्येक जातीत आहे.) जातीबाहेर लग्न केलेल्या मुलींना चित्पावन म्हणून सहभागी करून घेण्यास ५०% लोकांचा नकार असतो तर ५०% बाजूने असतात पण परत हेही प्रत्येक जातीत असते आणि त्या मुलीची संतती ही तिच्या नवऱ्याच्या जातीने ओळखली जाते हेही प्रत्येक जातीत आहे. हे योग्य की अयोग्य हा मुद्दा स्वतंत्र आहे. मी जातीबाहेर लग्न करून स्वतःला चित्पावनच मानते. लग्नाने मुलीचं मूळ अस्तित्व पुसलं जाणं मला मान्य नाही आणि ते कायदेशीररीत्या पुसलं गेलं तरी खरोखरीचं कधीच पुसलं जात नाही. माझे संस्कार, मी जी जशी आहे तशी असणं हे सगळं तेच रहातं पण हे सगळ्यांनाच पचत नाही. नाही तर नाही. आता माझा प्रश्न तुम्हाला... तुम्ही ज्या काय जातीचे असाल त्या जातीचे संमेलन असल्यास हा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला काय उत्तर मिळेल? किंवा कुठल्याही जातीच्या संमेलनासंदर्भात माझ्या वरच्या उत्तरापेक्षा काही वेगळे उत्तर मिळेल असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत. माझ्या सासरी मला पटकन आपण ९६ कुळी गं, असं असं नसतं आपल्यात असं म्हणणारी माझी मावससासू तिच्या जातीबाहेर लग्न केलेल्या मुलीच्या संदर्भात बोलताना म्हणते की अगं ती अमुक तमुक आहे, त्यांच्याकडे ही पद्धत असते. येणारी सून आपल्या जातीतली, बाहेर लग्न करून जाणारी मुलगी त्या बाहेरच्या जातीतली असं सरळ सरळ विभाजन आपला संपूर्ण समाज करतो.. तस्मात केवळ चित्पावन म्हणून यावर आक्षेप तुम्ही घ्यावा हे काही बरं वाटलं नाही.
>>३. या संमेलनासाठी शंभरावर परदेशातून प्रतिनिधी येणार आहेत अशी अपेक्षा आहे. बहुतेक सर्वच आप्रवासी भारतीयांची परदेशात वाढलेली मुले आपापसात इंग्रजीतच बोलतात. फार तर "हंग्री झालो की केक ईट करतो आणि थर्स्टी झालो की कोक ड्रिंक करतो." अशा प्रकारची भारतीय भाषा बोलतात असा माझा अनुभव आहे. त्यांच्यातील 'चित्पावनां'ची गणना यात होते काय?<<
या प्रश्नाचा सूरच इतका कुत्सित आहे की त्याला तसंच कुजकं उत्तर हवं पण तसं उत्तर दिलं तर भडका उडणार. ते टाळलेलंच बरं.
>>४. हे संमेलन फक्त निमंत्रितासाठी मर्यादित आहे की कोणालाही (स्वतःला चित्पावन समजणाऱ्या व्यक्तीला) इच्छा असल्यास तो त्यात भाग घेऊ शकेल? <<
मला वाटत नाही या संमेलनाच्या जाहीरातीमधे कोणी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रयत्न केलाय. कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण जातीत जन्म घेतलेल्यांसाठी हे संमेलन आहे हे उघड आहे. तेव्हा तुम्ही म्हणाल की मी स्वतःला चित्पावन समजतो कारण माझं मन शुद्ध आहे तर तसं चालणार नाही. मला वाटतं हे कुठल्याच जातीच्या संमेलनाला चालणार नाही.
असो तर मुद्दा असा की केवळ कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजाने संमेलन ठरवले म्हणून कुणी आक्षेप घेऊन कायद्याने बंदी आणावी असले तारे तोडणार असेल तर ते मान्य नाही. वरती एकांनी दिलेल्या यादीतील सगळ्याच गोष्टी आक्षेपार्ह होऊ शकतात मग. असोच...