नागपूरात असताना प्रकर्षाने जाणवले की तिथे लोक 'मी आले' , 'मी आलो' असे नाही म्हणत, 'मी आली', 'मी आला' असे म्हणतात.
शिवाय नागपुरकरांमध्ये 'देऊन दिले', 'घेऊन घेतले', 'चालले गेले' वगैरे क्रियापदांचा वापरदेखील अगदी सरसकटपणे केला जातो. मध्यप्रदेश जवळ असल्याने हिंदीचा हा प्रभाव असावा. हिंदीमध्ये जसे 'दे दिया', 'ले लिया' वगैरे म्हणतात, त्याचे शब्दशः भाषांतर केले आहे इथे.
वरदा आपण म्हणता तसा 'केल्या जाते' वगैरेचा वापर मी माझ्या सासरकडच्या मंडळींकडून ऐकला आहे. ते नागपूरकरच आहेत.
आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे त्या भागात 'चव्वेचाळीस' न म्हणता 'चवरेचाळीस' म्हणतात. आणि माझ्या नवर्‍याच्या आणि काही इतर मित्र-मैत्रिणींच्या मते त्यांना असे शाळेत शिकवले आहे. कृपया कोणता उच्चार बरोबर ते मनोगतकरांनी सांगावे.
माझे काही पुणेरी मित्र-मैत्रिणी 'प्रश्न' न म्हणता 'प्रश्ण' म्हणतात. ह्यातले काय बरोबर ते ही सांगितले तर बरे होईल.