साबुदाणा केरळ मध्ये सुद्धा होतो! साबुदाणा परदेशी कसा काय? ... त्याचा उपयोग कश्यासाठी आणि कसा करायचा ते आपण कुणाकडुनही शिकु शकतो त्याने तो पदार्थ अथवा जिन्नस परदेशी होत नाही!

मूळ मुद्दा हा आहे, की आज हे पदार्थ भारतात कितीही प्रचलित असले, अगदी आपलेच वाटावेत इतके, तरी हे पदार्थ मुळात परकीयांबरोबर हिंदुस्थानात आले, आणि उपवासाचे नियम जेव्हा बनवले गेले, तेव्हा ते हिंदुस्थानात उगवत नसावेत किंवा त्यांचा खाद्योपयोग माहीत नसावा. आणि उपवासाचे नियम बनवताना बहुधा 'उपवासाचे दिवशी काहीही खाऊ नये' असा नियम केल्यास कोणीही तो पाळणार नाही, म्हणून तत्कालीन खाद्यपदार्थांची यादी बनवून 'या यादीपैकी काहीही खाऊ नये' असे म्हणून ती यादी शक्य तितकी 'एक्झॉस्टिव्ह' [मराठी?] करण्याचा प्रयत्न केला गेला असावा. मात्र पुढे परकीयांशी संपर्कामुळे जेव्हा हे नवीन खाद्यपदार्थ माहीत झाले, तेव्हा अर्थातच ते यादीत नसल्यामुळे 'यादीत नाही म्हणजे उपवासाच्या दिवशी हे खाल्लेले चालते' असा सोयिस्कर अर्थ लावला गेला असावा. निदान असा माझा तरी कयास आहे.

उपवासाला चालणारे बहुतेक सर्व पदार्थ परकीयांशी संपर्कातून हिंदुस्थानात वापरात आले, असे दिसते. पैकी बटाटा हा पोर्तुगीजांनी आणला असावा, असे वाटते. बटाटा हा शब्दसुद्धा मुळात पोर्तुगीज आहे. बटाटा हे मुळातले दक्षिण अमेरिका खंडातले पीक असून स्पॅनिश आक्रमकांबरोबर ते प्रथम स्पेनला आणि तेथून युरोपीय वसाहतवाद्यांबरोबर जगभर पसरले. रताळे हेही मूळचे अमेरिका खंडातलेच. साबूदाणा हा पदार्थ एक तर कसाव्हा या वनस्पतीपासून बनणाऱ्या टॅपिओका या पिष्टमय पदार्थापासून किंवा पर्यायाने सॅगो पाम या वनस्पतीपासून बनणाऱ्या पिष्टमय पदार्थापासून बनतो. पैकी कसाव्हा हे मूळचे दक्षिण अमेरिका खंडातले पीक आहे, तर सॅगो पाम हे मूळचे आग्नेय आशिया, पॉलिनेशिया, मायक्रोनेशिया आणि न्यू गिनी येथील आहे. अर्थातच हे सर्व घटक हिंदुस्थानात परकीय संपर्कातूनच आले असणे प्राप्त आहे.

याव्यतिरिक्त, शेंगदाणा हा तरी निदान आपल्याकडचा पारंपारिक असेल या कल्पनेखाली असल्याने तो तरी कसा चालतो, या शंकेतून विकीशोध घेतला असता, शेंगदाणा हेही मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिका येथील पीक असून युरोपीय व्यापाऱ्यांबरोबर जगभर पसरले, असे समजले. ऐकावे ते नवलच!

आता प्राणीजन्य तुप - जे दुध देतात ते प्राणी शाकाहारीच असतात ना? मग त्या दुधा पासुन केलेले तुप आणि वनस्पती तुप यात फरक तो काय?

हे म्हणजे थोडेसे "गाय शाकाहारी असते, मी स्टेक आणि बर्गर (पर्यायाने गोमांस) खातो, तेव्हा मीही शाकाहारीच आहे" असे म्हणण्यासारखे झाले.  ट्रॅंझिटिव्हिटी [मराठी?] येथे चालत नाही!

त्याहीपुढे जाऊन, गायीचे तूप आणि गायीची चरबी यांत रासायनिकदृष्ट्या बहुधा फरक नसावा असे वाटते. (चूभूद्याघ्या!) तेव्हा मग गायीचे तूप खाल्ले काय किंवा गायीची चरबी खाल्ली काय, काय फरक पडतो? आणि मग १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध-किंवा-बंड-तुम्ही-जे-काही-म्हणाल-ते हे मुळात चुकीच्या पायावर उभारले होते काय? असो.

अर्थात हे सर्व बोलण्यापुरते आहे. शेवटी आपण आपली आवड, प्रकृती, वगैरे गोष्टी लक्षात घेउन कारभार करावा हे उत्तम!

हे मात्र एकदम बरोबर! कळीचा मुद्दा!

- टग्या.