जेंव्हा गुढीपाडव्याचा सण साजरा होतांना दिसतो तेंव्हा तेंव्हा मला गो. ना. दातार या लेखकाची शालिवाहन शक ही अद्भुतरम्य कादंबरी आठवल्याखेरीज राहत नाही. ( ही कादंबरी वाचुन अंदाजे २५ वर्ष झाली असावी.).
या कादंबरीचे ढोबळमानाने कथानक असे आहे, परकीय शकांचे आक्रमण होवुन हिंदु वैदिक धर्म रसतळाला चाललेला आहे, किंबहुना धर्म नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. याकाळात सातवाहन कुळात राजा पुळुमीयी जन्माला येतो. त्याच्या विरुध्द सामर्थ्यशाली शक नृप नहपान असा असतो. शकांची राजधानी गुजरात मध्ये आणि सातवाहनांची राजधानी पैठण येथे असते. या दोघांचे अंतिम निर्णायक असे युध्द नासिक जवळ गोवर्धन या गावाजवळ घडते.
पूळूमीयी अनेक योजना आखतो आणि प्रजेचे मन जिंकुन शेवटी राज्यप्राप्ती करतो. अनेक लढाया, प्रेमप्रकरणे, शह - काटशह असलेली कांदबरी वाचायला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.
यात ज्या दिवशी सातवाहनांना विजय मिळाला तो दिवस गुडीपाडवा म्हणुन साजरा होतो अशी कथेची समाप्ती.
पुळुमीयीची शालिवाहन ही पदवी असावी. शालिवाहन-शक या कादंबरी चा एक अर्थ शालिवाहन आणि शकामधील संघर्ष आणि दुसरा अर्थ शालिवाहनांने पराक्रमाने कसे स्वताचे कालमापन संवत्सर सुरु केले त्याची ही कथा.
मागच्या १०/१२ वर्षात ही कांदबरी पुन्हा मिळवुन वाचण्याचा बराच प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
सर्वांना शालिवाहन शक १९२७ आनंदाचे जावो.
द्वारकानाथ