माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माझ्या एका मित्राने मला विचारले की वाढदिवशी तुझ्यासाठी घरी सर्प्राइझ बनते की नाही? मी त्याला सांगितले की माझा वाढदिवस राष्ट्रिय सुट्टीच्या दिवशी येत असल्याने, मी नेहेमी घरीच असते आणि वाढदिवशी बनणारे पदार्थ मी आईला बनवायला मदत करते. त्यामुळे सर्प्राइझ वगेरे काही नसते.  घरी आल्यावर मी नेहेमीप्रमाणे दिवसातील सगळ्या घडामोडी आईला सांगितल्या त्यात हे ही सांगितले.  दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे मी आणि आईने मिळुन जेवण बनवले, जेऊन झाल्यावर, माझ्या शेजाऱ्यानी मला त्यांच्या घरी विडिओ वर चित्रपट पाहायला बोलावले.  (तेव्हा वि.टेप आणून चित्रपट पाहायचे खुप फ़्याड होते). संध्याकाळी घरी आले तर माझ्या आईने अख्खी दुपार खर्चून नारळाच्या वड्या बनवल्या होत्या माझ्यासाठी.  मला त्या देऊन ती म्हणाली की उद्या तुझ्या मित्राला पण नेऊन दे आणि त्याला सांग की तुझ्यासाठी पण घरी सर्प्राइझ बनते म्हणून.  माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले.  आजही वाढदिवशी मला ही आठवण नेहेमी येते.

साधना.