मला द्वारकानाथांचा विचार पटला. तसेच बस सेवा सुरू झाल्यामुळे सारे काही सुरळीत होईल असे नाही हे सुद्धा मान्य. तिकडले लष्करशहा उद्या नेमके काय करतील ह्याचा अंदाज ना नेहरूंना बांधता आला ना अटलजींना. आपल्याकडील नेते निदान लोकमताचा आदर तरी करतात, तिकडून ती अपेक्षा नाही. त्याचप्रमाणे अतिरेकी बसमधून येतील अशी भिती बाळगण्यात काही अर्थ नाही असेही वाटते. इतकी वर्षे बसची वाट न बघताच अतिरेकी येत होते ना? अतिरेक्यांना बसची गरज नाही. बसची गरज आहे दोन्ही काश्मिरातील सामान्य लोकांना. ह्या बसमुळे कित्येक वर्षानंतर एकमेकांना भेटलेल्या भावांच्या डोळ्यांतील पाणी दूरदर्शनवर बघून मला त्या बसची उपयुक्तता पटली.
जास्त वादात न पडता मी ह्या ठिकाणी एक कविता पेश करतो. अख़्तर शिरानी आणि अहमद फराज़ ह्या दोघांनी मिळून लिहिलेल्या ह्या कवितेत अशी कल्पना आहे की फाळणीनंतर प्रथमच भेटलेल्या मित्राला कवी काय विचारतो! पूर्वी एकत्र नांदलेल्या दोन मित्रांचे संभाषण आहे हे. कविता उर्दू/हिंदीमध्ये आहे आणि काही उर्दू शब्दांचे अर्थ शेवटी दिले आहेत. प्रसिद्ध सुफी गायिका आबिदा परवीन ह्यांनी गायलेले हे गाणे ऐकले की (माझ्या तरी) अंगावर शहारे येतात, भितीने नव्हे अनुभूतीने!
मला वाटतं की माणूस हा माणसाचा शत्रू नसतो, त्याला तसे हेतूपुरस्सर बनवले जाते. त्यात ज्या लोकांचा स्वार्थ असतो त्यांच्याकडून. भारत पाकिस्तान एकमेकांचे चांगले शेजारी होऊ शकले तर ते सर्वांच्याच फायद्याचे ठरेल. तसे होवो ही मनापासून इच्छा!
(प्रशासकांची पुस्ती : हे संकेतस्थळ हे जास्तीत जास्त मराठी लिहिले वाचले जावे ह्यासाठी तयार करण्यात आलेले आहे आणि इतर भाषीय मजकूर येथे फक्त नाईलाज ह्या स्वरूपातच (सुमारे दहा टक्के किंवा कमी) लिहिला जावा असे धोरण आहे. ह्या कारणाने आम्ही ती कविता आपल्या प्रतिसादातून काढली आहे. तिचे समछंदी भाषांतर करून येथे सादर करावे असे सुचवावेसे वाटते.)
द्वारकानाथजी, पाकिस्तान दौर्यावर यायला मला आवडेल पण मी शुद्ध मांसाहारी आहे!
आपला,
-राजेन्द्र