मी नागपूरचा, पण "मी आला" असे कुणी पुरुष (किंवा स्त्री) म्हणताना कधी ऐकले नाही. "मी आले" च्या ऐवजी "मी आली" असे स्त्रीच्या तोंडून मात्र अनेकदा ऐकले आहे. वर्हाडी किंवा झाडीपट्टीतील बोलीमध्ये स्त्री व पुरुष दोघेही "मी आलो" असेच म्हणतात. आणि आपली भाषा संस्कृतोद्भव आहे हे लक्षात घेता स्त्री पुरुष दोघांनीही "मी आलो, मी गेलो" असे म्हणणे हे संस्कृतच्या नियमानुसार बरोबर आहे. (संस्कृतमध्ये स्त्री-पुरुष दोघेही "अहं गच्छामि" असेच म्हणतात.)
वर्हाडी बोलीतील अनेक शब्द (मराठीपेक्षा) संस्कृत शब्दांच्या जास्त जवळ आहेत. ह्याची कारणे शोधत असताना एक विचार असा आला की पुरातन काळात विदर्भात संस्कृती जास्त विकसित होती. अगस्ति-पत्नी लोपामुद्रा, प्रभु रामचंद्रांची आजी इंदुमती, श्रीकृष्ण-पत्नी रुख्मिणी ह्या सर्व विदर्भाच्या राजकन्या. विदर्भात राहणार्या ऋषींनी रचलेली सूक्ते ऋग्वेदात आहेत. म्हणजे इथली संस्कृती ऋग्वेदकालापेक्षाही जुनी आहे. त्याकाळी प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेचा परिणाम इथल्या बोलीभाषेवर जास्त दिसतो. नंतरच्या इतिहासात राजकीय केंद्र पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे गेल्यामुळे तिथे प्रचलित असलेल्या भाषेला मान्यता मिळाली आणि तीच आज विकसित होऊन प्रमाण मराठी भाषा म्हणून ओळखली जाते.
कृपया ह्याचा अर्थ असा काढू नये की आजची प्रमाणभाषा बदलायची गरज आहे. फक्त बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण-मराठीचे नियम लावून त्यांना चूक ठरवले जाऊ नये, एवढेच माझे म्हणणे. बोलीभाषांचे व्याकरण स्वतंत्र आहे. प्रत्येक बोलीभाषेचा गोडवा भिन्न आहे. प्रमाण-मराठीने बोलीभाषांना दुय्यम स्थान न देता त्यातील काही अर्थवाही शब्दांना सामावून घेतले पाहिजे. उर्दू-फारसी सारख्या परकीय भाषांचे शब्द आज मराठीत रूढ झाले असताना आपल्याच भाषा-भगिनींशी परकेपणा कां ठेवायचा?
आपला
(मराठी-प्रेमी) राजेन्द्र