नमस्कार,
दिनांक १५ सप्टेंबर, २००७ रोजी गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम हे एक नवं, मराठमोळं संकेतस्थळ आंतरजालावर दाखल होत आहे, हे जाहीर करण्यास आनंद होतो आहे. मनोगत, मायबोली, उपक्रम, मराठी गझल, माझे शब्द, यांसारख्या दिग्गज वटवृक्षांच्या सावलीतच मिसळपाव डॉट कॉम हे 'इवलेसे रोप लावियले द्वारी..' अशीच मिसळपावकारांची भावना आहे! आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते! आपले साहित्य, विचार इ. मराठीतून व्यक्त करण्यासाठीचे हे एक खुले व्यासपीठ असेल. ललित लेख, वैचारिक लेख, काव्य, चर्चात्मक विषय, आदींवर येथे लिहिता येईल, त्यावर प्रतिसाद देऊन मतप्रदर्शनही करता येईल. सभासदांच्या बाबतीत अधिकाधिक लोकाभिमुख व लोकशाही पद्धतीने हे संकेतस्थळ चालवण्याकडे मिसळपाव प्रशासनाचा कल राहील असे कळते! मिसळपाव डॉट कॉमने 'गमभन' ह्या मुक्तप्रणालीकडे विशेष ऋणनिर्देश व कृतज्ञता व्यक्त केली आहे. इच्छुकांनी सदर संकेतस्थळाला अवश्य भेट देऊन त्याचे सभासदत्व घ्यावे, ही विनंती!
नीलकांत.