अनमिक,

गौराईच्या तुम्ही केलेल्या वर्णनाने मला पन्नास वर्षे मागे नेले. तुम्ही वर्णिलेले गौरी-गणपति मझ्या लहानपणी आमच्या घरी होत असत. गौरीचे छायाचित्र पाहून तर मी हरखून गेलो. आमच्या गौरी अगदी अशाच असत. माझी आई म्हणायची गौराई आपल्या घरी माहेरपणाला आली. मग ती भावना मनात ठेऊन गौराईचे सगळे कोडकौतुक व्हायचे. वाटायचं, गौराई माहेरपणाला आलेली आईची मुलगी तर आपली कोण? तर बहीणच! मग आईला मुलीचं अप्रूप तर आम्हा मुलांना मोठ्या ताईचं कौतुक. एरवी आम्ही  केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आम्ही गौराईसाठी जपून ठेवलेल्या असायच्या. त्या मग आरास करतांना मांडून ठेवायचा आमचा हट्ट असायचा. मझ्या मुलांच्या घरी आजही गौरी-गणपति होतातच पण सजावटीत कालानुरूप बदल होत गेले. परातीतल्या रंगीत पाण्यातले तरंगते दिवे गेले, विजेच्या लुकलुकणाऱ्या माळा आल्या. माझ्या छातीएवढ्या उंचीची ठाणवई गेली, हॅलोजनचे फोकस आले. पण भाजी-भाकरीचा नैवेद्य अजूनही होतोच. त्याची चवही अजून तशीच लागते. गौरी विसर्जनाच्या दिवशी अजूनही डोळ्यात पाणी येतेच.

तुम्ही तसेच अन्य अनिवासी भारतीय तिकडे दूरदेशी गौरी-गणपतिसरखे सण हौसेने आणि श्रद्धेने साजरे करता हे वाचून फार बरे वाटले. तुमच्या घरच्या गौराईला माझाही नमस्कार.

शुभं भवतु

अरुण वडुलेकर