सर्वप्रथम भरभरून प्रतिसाद देण्याऱ्या सर्व मनोगतींचे आभार! बकुळ, प्रियाली, विनायक, आजानुकर्ण... सर्वांची नावे घेऊन या आभारप्रदर्शनाचा थेट कुठल्यातरी "पांडवनाथ ग्रामीण विकास पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे"सारखा रटाळचोथा विस्कोट करीत नाही. मात्र सर्वांच्या मताचा आदर करूनही नोंदवू इच्छितो, की विनायक, सन्जोप राव, प्रदीप, केवाका (हीदेखील 'संपूर्ण यादी' नव्हे) आदि मंडळींनी चांगलेच गोरेमोरे करून सोडले!

काही संदर्भांविषयी मोघम (मोघम अशासाठी की नाहीतर हे नवनीतचे गाईडच होऊन जाईल) विवेचन येणेप्रमाणे

(१) गोष्टीच्या नावात काहीही गूढ / प्रतीकात्मक वगैरे नाही. लिहायला सुरुवात करतानाच हे नाव डोक्यात बसले होते म्हणून ते दिले.

(२) गोष्टीतला काळ साधारणपणे १९६५-७० चा आहे. बकुळ यांनी तत्संबंधीचे उल्लेख टिपले आहेतच. 'निखिल' नावामुळे कदाचित थोडासा घोळ झाला असेल. पण गणितच मांडून बसले तर आज निखिलने पन्नाशी नुकतीच पार केलेली असेल. आणि वयाच्या लोकांमध्ये निखिल हे नाव तुरळक का होईना आढळू शकेल.

(३) कोड संसर्गजन्य नसते ही माहिती तोपर्यंत समाजात खोलपर्यंत रुजली नव्हती. तसेच ते 'दिसण्यासारखे'च असावे असेही नसे. पोटरीवरच्या एका पांढऱ्या चट्ट्याने (कोडसुद्धा नव्हे) नवऱ्याने टाकून दिलेली एक स्त्री मी त्या पुढच्या दशकात पाहिलेली आहे. तरीही अजून विश्वसनीय वाटावे म्हणून कथा एका दशकाने मागे सरकवली.

(४) कोड संसर्गजन्य नसते हे बाधित व्यक्तीला माहीत असेल का याबद्दल संदिग्धता ठेवायचा प्रयत्न केला आहे.

(५) हे कोंकण 'नेहमी'च्या कोंकणासारखे वाटत नाही हे खरेच. पण या गावाच्या भौगोलिक स्थितीचे तीनचार अंधुकसे दुवे देऊन ठेवले आहेत!

(६) ज्ञातीबांधवांचे दडपण झुगारून देणे अशक्य असलेले अनेक समाजसमूह आजही दिसतात. वर दर्शवलेल्या कालखंडात तर असे बरेच होते. 'कोड फुटलेली मुलगी टाकून द्यावी' असे ज्ञातीचे दडपण उडवून लावण्याची ताकद अगदी 'सुशिक्षित' आणि 'उच्चपदी पोचलेल्यांच्यात' आजही अनेकदा नसते. इथे असल्या कुठल्या समूहाचा थेट उल्लेख करून ही 'भूतकाळातील शोधपत्रकारिता' करण्याऐवजी त्यांना 'नेने' करून टाकले. नाहीतरी ब्राम्हण (आणी त्यातही कोंकणस्थ) हे ठोकायला सोयीचे असतात. ना कोणी तोंडाला काळे फासते ना कोणी जाळपोळ करते! (अर्थात हे त्या कुमार केतकरांना सांगू नका कुणी - 'त्या' सभेवर आणि 'सांस्कृतिक ठोकशाही'वर सदतिसावा अग्रलेख पाडतील!)

(७) तरीही कुठे तपशीलात 'विसंगती' आढळलीच तर 'लेखकाचे स्वातंत्र्य' या नावाखाली खपवून घ्यावे!

शेवटी, "साहित्य आणि जीवन यात काय फरक आहे? तर साहित्य हे तर्कशुद्ध आणि विश्वासार्ह असावे लागते!" - मार्क ट्वेन.

पुनश्च धन्यवाद.