हीप्राक्तना,

मी स्वत: आणि माझा धकटा मुलगाही या वाचादोषाने पीडित आहोत. सर्वसाधारणपणे या दोषाला मराठीत तोतरेपणा तर इंग्लिश मधे स्टॅमरिंग म्हटले जाते. हा मूलतः मजासंस्थेतील दोष आहे. याचा संबंध मनाशी देखील आहे. सहसा असा दोष असणारी माणसे कोणतेही गाणे मात्र अगदी न अडखळता सहजपणे म्हणू शकतात. बोलतांनाही घरच्या माणसांशी किवा मित्र मैत्रिणींशी बोलतांना ते फारसे अडखळत नाहीत. मात्र कोणी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देतांना फार अडखळतात. एक मात्र खरे की या दोषावर कोणत्याही उपचार पद्धतीत औषध नाही. प्राणायामासारखी कांही श्वसनाचे व्यायाम थोडाफार फरक देतात. एरवी या दोषाची लाज न बाळगता धीटपणे बोलत राहणे, बोलतांना आपण कुठे अडखळू शकतो याचा अंदाज घेऊन जरा थांबणे अणि मग तो शब्द बदलून त्याच्या ऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरणे असे उपाय करावे लागतात. संस्कृत स्तोत्रांचे पठण मोठ्याने केल्याने फायदा होतो. तसेच योगासनतली सिंहमुद्रा नियमितपणे करण्याचा प्रयत्न करावा. होमिओपॅथीमध्ये कांही औषधे आहेत. पण ती उत्तेजना (anxiety) कमी करणारी असतात. पण त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्व कांहीसे मंद होऊन त्याचा परिणाम शालेय प्रगतीवर होण्याचा धोका आहे. यावर कांहीही बाह्य उपचार नाहीत. मी वर सुचवलेले उपाय फायदेशीर ठरतील. तुमच्या मुलीत एखाद्या कलाप्रकारात पारंगत करा. ती कोणी सामान्य मुलगी नाही; तिच्यात एक फार उच्च दर्जाची बौद्धिक क्षमता आहे. हे तिच्या मनावर ठसवा आणि तुम्हीही ते पक्के ध्यानात असू द्या. त्याने तिला एक वेगळे व्यक्तिमत्व प्राप्त होऊन तिचा आत्मविश्वास वाढेल. तिच्या या दोषाची तिच्यासमोर चर्चा तर दूर राहो, त्याचा साधा उल्लेखही करू नका. कोणत्याही परिस्थितीत  तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार अशी काळजी मात्र जाणीवपूर्वक ध्यावी.

कळावे. शुभं भवतु.