ओले काजु जानेवारी फेब्रुवारी च्या सुमारास काही ठराविक ठिकणी मिळतात. म्हणजेच कोकणात, गोव्याला, आणि जिथे काजुचे पिक येते तिथे ( मी अनेकदा या हंगामाच्या आधी, नंतर धडपड करुन ओले काजु मिळवले देखिल आहेत, पण जरा कठिणच गोष्ट आहे - अशक्य नाही, गैरसमज नसावा!)
नेहमिचे कजु भिजत घालुन अगदी तश्शीच चव येणे अशक्य आहे. हे म्हणजे बेदाणे भिजत घालुन त्याची द्राक्षे होण्याची अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. समजण्यासाठी प्रामाणिक पणे उपमा दिली आहे, टिंगल करणे हा हेतु नाही!
तसेच ओले काजु हे जिथे जिथे मिळतात तिथे ते वाटा अथवा नगावर मिळतात. कसेही घेतले तरी साधारण नगास पन्नास पैसे ते सव्वा रुपया इतका भाव पडतो. हंगाम आहे कि नाही, काजुचे आकारमान काय आणि खरेदी कुठे आणि कोण (सराईत कि नवखा) करत आहे यावर आणि अश्या काही बाबींवर अवलंबुन आहे हे भावाचे प्रकरण!
अंकोला काजु (वाळवलेले, सालासकट असतात - हे पारंपारिक सुक्या काजु सारखे नसतात, हे खास भिजवुन उसळ करण्यासाठीच असतात - भाव साधारण ४०० रुपये किलो!) नावाचे काजु आणुन डीप फ्रीझर मध्ये ठेवले आणि लागतील तेव्हा ४-५ तास भिजवुन वापरले तर बरिचशी मिळती जुळती चव येते.या सर्व बाबी लक्षात घेता हॉटेलमध्ये मिळणारी काजुची उसळ ओल्या काजुंची नसुन नेहमीच्या काजुंची (भिजत घालुन वगैरे) केलेली असते असे खुशाल समजावे! कारण साध्या काजुंचा भाव २२५ रुपयांपासुन सुरु होतो, होटेलवाल्यांना यापेक्षा खर्च आणि लाड करायला परवडणार नाही!