'सारे प्रवासी गाडीचे' ही लेखमाला सुमार दर्जाची व रटाळ होत आहे हे अत्यल्प प्रतिसादामुळे लगेच लक्षांत आले आहे.

पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद लाभला होता. आतापर्यंत दोनच भाग प्रसिद्ध झाले आहेत, तेव्हा लगेच ह्या कारणामुळे ही लेखमाला बंद करण्याचा विचार करत आहात, हे जरा आश्चर्यकारक  आहे. अजून जरा अवधी जाऊ द्यावा.  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यालाच आपण जे लिहीले आहे, ते कसे आहे ह्याची जाण असतेच. तेव्हा तो निकष महत्त्वाचा.

जाता जाता, पहिल्या भागात रंगवलेले व्यक्तिमत्व थोडे अधुरे वाटले. म्हणजे ''स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी भल्याभल्यांचे वस्त्रहरण केले पण तारतम्य न पाळल्यामुळे नोकरीत तसेच व्यवसायांत नुकसानही भरपुर झाले' असे आपण लिहीलेत. व त्यानंतर पुढे '....'.योग्य संधी मिळताच त्यांनी कर्तुत्व सिद्ध केले'. ह्या दोन विधानांचा ताळमेळ मलातरी लागला नाही. म्हणजे ही व्यक्ति इतकी स्पष्टवक्ति की तिने अनेकांना सहज दुखावले. तरी तिने आपला स्वभाव बदलला नाही (तसा कुठे उल्लेख नाही). मग अचानक काय क्ळ फिरली की ज्यामुळे तिचा व्यवसाय एकदम जोरात चालू लागला? मुळात (आणि आता हे थोडे अवांतर होते आहे) कुणीतरी एकदम स्पष्टवक्ता आहे ह्याचे आपणा मराठी जनांना नको तेव्हढे कौतूक असते. आयुष्यात सर्वच ठिकाणी आपणाला अनेक तडजोदी कराव्या लागतात, त्यात ह्या स्पष्ट बोलण्याच्या उर्मीस लगाम घालणे ही एक महत्त्वाची तडजोड. ती जर केली नाही तर त्याचे परिणाम सर्वत्र भोगावे लागतात. तेव्हा स्पष्टवक्तेपणा आणि नोकरी अथवा धंदाव्यवसायात यश ह्या दोन्ही बाबी बरोबर राहू शकत नाहीत.