कुणीही आपल्या पेल्यात चहा ओतल्यावर आपल्या उजव्या हाताची पहिली दोन बोटे प्लेटच्या उजव्या बाजूस टेबलावर टेकवून थोडीशी पेरात वाकवायची, व हलकेच आपटायची अशी प्रथा आहे. ह्याचे मूळ (अर्थात सर्वच चिनी गोष्टींप्रमाणे) एका ऐतिहासिक दंतकथेत आहे. तो कुणी एक राजा होता (अर्थातच, बलाढ्य, कर्तृत्ववान वगैरे) त्याला एकदा आपल्या राजधानीत काय चालले आहे हे हळूच प्रत्यक्ष बघण्याची लहर आली. तेव्हा तो वेशांतर करून निघाला. तो एका ठिकाणी आला, जिथे बरेच लोक भोजन करत बसले होते. राजा त्यांच्यात सामिल झाला. मग त्याने तेथील चहाची किटली घेऊन सर्वांना चहा ओतला. त्या मंडळीत एक सरदार होता, व त्याने राजाला ओळखले होते. त्यामुळे जेव्हा राजाने त्याला चहा ओतला, तेव्हा त्याने ही क्रिया केली. म्हणजे एका अर्थाने तो गुढघ्यावर टेकून राजासमोर जणू प्रणिपात करत होता. तेव्हापासून ही प्रथा चिनी जनतेत रूढ झाली.

सर्वजण बँक्वेटला बसले असतांना, छाच्या किटल्या टेबलावर असतातच. हा छा जेवतांना मध्येच घोट घोट घ्यावयाचा असतो. त्यामुळे अन्न पचायला मदत होते. हा छा सुंदर असतो व त्याची एकदा सवय झाली, म्हणजे मग सुटका नाही!  मध्येच कुणीतरी उठून सर्वांचे रिकामे पेले भरतो. किटल्या  अनेकदा परत परत भरल्या जातात.

चिनी लोक कार्यालयातही छा नेहमी घेतच असतात.  छाचा मग ज्याच्या टेबलावर नाही, असा चिनी दुर्मिळच!