म्हणी या सामान्यतः रुपकांद्वारेच त्यांचा आशय व्यक्त करतात ना ? त्यादृष्टीने पाहीले तर त्याही साहित्य/ललितलेखनाचा भाग नाहीत का ? मग जर 'म्हणींचे संकलन' असा उद्देश असेल तर त्यामध्ये व्याकरणाचे नियम न पाळणारी बोलिभाषेतील एखादी म्हण समाविष्ट केली तर बिघडले कुठे ? म्हणींचे संकलन हे 'विचारप्रदर्शन' या विभागाखाली नक्कीच येत नाही.

भिन्न विचारांचे विवादक विचारप्रदर्शनासाठी एका व्यासपीठावर आले असता, त्यांच्यात संवाद साधण्याकरता प्रमाण भाषा वापरावी हे योग्यच आहे; पण ते प्रमाण किती काटेकोर असायला हवे हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. एखादा विवादक 'लसणीची चटणी' म्हणाला, आणि दुसरा 'लसणाची चटणी' म्हणत असेल, तर मग यातले काय ग्राह्य धरणार ? आणि या लहानशा फरकामुळे मूळ मुद्दा समजायला खरोखरच अडचण होते का ? एखादा 'पानी' म्हणत असेल तर त्याला 'पाणी' अभिप्रेत आहे हे समजणे अवघड आहे का ?