शेवट खास फिल्मी आहे, हे खरेच. पण माझा आक्षेप चौकसांना खूप प्रिय असणाऱ्या तिरकस विनोदावर आहे. उदा. "..'पण ती मदभरी हाक ऐकल्यावर राजू समुद्रातही उडी घालायला तयार असे (त्याला पोहता येत नव्हते). ---त्याच्या सुदैवाने इथून दीडशे किलोमीटरपर्यंत समुद्र नव्हता." मला असे वाटते की असे विनोद (खरे तर, दैनिकाच्या किंवा साप्ताहिकाच्या सदरात शोभून दिसतील असे) तेचढ्यापुरते ठीक वाटत असतील, तरी ते कथेच्या मुळात करूण गाभ्याला छेद देतात. चौकसांना विलक्षण संवेदनाशील लिखाण सहज जमते, अनुभवांकडे ते धीटपणे बघूही शकतात, पण असले विनोद रसभंग करतात. त्यांच्याकडे लिखाणासाठी इतके बाकीचे संचित आहे, की कथा 'चटकदार' बनवण्यासाठी त्यांना अशा विनोदाचा वापर करायला का लागावा?
ह्यावरून आठवले, नंदनने लिहीलेल्या पानवलकरांच्या पद्म ह्या नितांतसुंदर कथेच्या वाचनानंतर मी जरा निवांतपणे माझ्यासंग्रही असलेला त्यांचा 'कांचन' हा संग्रह वाचावयास घेतला, तो खूप अपेक्षेने. तो त्यांच्या शेवटच्या काळात लिहीलेल्या ह्या कथा आहेत. त्यात एक कथा 'चावी' सगळी अशाच तिरकस विनोदावर आधारित आहे. वाचतांना मजा आली, पण मागे वळून पाहिल्यावर काही उरले नाही.