वरील प्रकारचे डोसे करता आले नाहीत त्याची कारणे पुढीलप्रमाणे असावीत.
- दोन कप रवा, १/२ कप तांदळाचे पीठ आणि पाव कप बेसन यांसाठी चार कप ताक/ पाणी हे फार कमी आहे.
रवा पाण्यात भिजवल्यावर पाणी शोषून घेतो आणि फुगतो. वरील प्रमाणात मिश्रण फार जाडे होईल डोशांसाठी उपयोगाचे नाही. असे झाले असल्यास हे मिश्रण एखाद्या पळीवरून रिबिनीसारखे खाली घसरेल अशाप्रमाणात पातळ करा. - वरील मिश्रण काही मिनिटांसाठी न भिजवता (काही म्हणजे ४-५ मि. पासून ५०-५५ मि. पर्यंत काहीही) कमीतकमी सुमारे अर्धा ते पाऊण तास भिजवा.
- तवा फार गरम झाला असेल तर डोसे पडत नाहीत. तेव्हा तवा नेहमी मध्यम आंचेवर ठेवा. एक डोसा झाल्यावर दुसरा डोसा करण्याआधी तव्यावरून पाण्याचा बोळा फिरवा.
डोसे पडायला आता हरकत नसावी. एवढे करूनही डोसे पडले नाहीत तर प्रयत्नांती परमेश्वर असे मानून पुन्हा प्रयत्न करा.