बेसबॉल खेळणं म्हणजे खूपच झालं. त्या मुलांचं अभिनंदनच करायला हवं होतं. या खेळाचे नियम कुणी सांगितले तर बरं होईल.

डबा-ऐसपैस, लपाछपी बरोबर आम्ही लगोरी खेळत असू. पहिल्यांदा लहान किंवा मोठ्या होत जाणाऱ्या नऊ किंवा अकरा फरश्या शोधायच्या. त्यांची एक लगोरी रचायची‌. सगळ्या मुलांमध्ये दोन टीम पाडायच्या.एका टीमने रबरी बॉलने ही लगोरी पाडायची. प्रत्येकाला तीन चान्स. पाडताना एक टप्पा पडून कॅच घेतला तर तो खेळाडू बाद आणि फरश्यांना लागूनच कॅच घेतला तर अख्खी टीमच बाद. लगोरी पडली की मात्र पळापळ. कारण बॉल येईपर्यंत लगोरी रचावी लागत असे.विरुद्ध टीमने लगोरी रचायच्या आत अप्पारप्पीसारखं बॉलनं शेकून दुसरी टीम बाद करायची.पण बॉल हातात घेऊन पळायचं नसे. जागेवरूनच बॉल मारायचा. मग तो चुकणार की बॉल परत लांब. लगोरी रचून झाली की लिंगोर्च्या असं काही तरी आम्ही ओरडत असू. मग दुसऱ्या टीमवर एक लगोरी चढली. शेवटी स्कोअरवरून जिंकलेली टीम ठरणार. मात्र खेळात गोंधळ, भांडणं ठरलेली.एखादा जोरात लगोरी फोडणार की मग फरश्या लांबपर्यंत पसरणार. त्या आणून रचेपर्यंत कुणीतरी आऊट. काहीवेळा अकरा फरश्या असतानाही कुणी तेरा फरश्या पण लावत असे.कारण सुरुवातीला जमवलेल्या फरश्यातल्या काही आसपास पडलेल्या असत. मग भलतीच फरशी लगोरीत लावली जात असे. मग ती अकरामध्ये होती की नाही यावरनं वाद. असा पार अंधार पडेपर्यंत खेळ चालत असे. अंधारात बॉल दिसायची मारामार. मग अजूनच गोंधळ.

लपाछपी, डबा-ऐसपैस मध्ये तर शर्ट, चपला बदलणे, ते मुद्दाम दिसावेत म्हणून प्रयत्न करणे, राज्य असणाऱ्यावर घोळका करून चालून जाणे असले प्रकार तर नेहमीच चालायचे. आजही हे खेळ कुणी खेळत असावं बहुधा!