आयुष्य म्हणजे काय हे भल्याभल्यांना न सुटलेले कोडे आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावावा. पण माझ्या मते आयुष्य हे आपण जगतो किंवा लोकं जगायला लावतात याच्या मधे कुठेतरी आहे. थोडक्यात ती एक अपरिहार्य तडजोड आहे. अगदी पूर्णपणे स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येईलही कदाचित, पण तसे करायला गेलो तर आपण समाजापासून दूर होत जातो. तारुण्याच्या मस्तीत ' समाज गेला उडत' असेही वाटते. पण जसजसे वय वाढत जाते तसे आपल्यातले दोष दिसू लागतात. संपूर्णपणे इतरांसाठी जगा, असे सांगणे हा ढोंगीपणा झाला. स्वार्थ हा कुणालाच सुटलेला नाही. पण आदर्श जरी होता आले नाही तरी आदर्शाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तरी करता आला तरी मोठेच यश मानता येईल.
आयुष्य आनंदी होण्यात मनाचा सहभाग फार मोठा आहे. ते स्थिर, नितळ व प्रामाणिक ठेवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.
अरे बापरे! लिहिता लिहिता मी मोठा संतांचा आव आणला आहे. पण हे मी स्वतः अनुभवले आहे. उतारवयात, सर्व काही मिळवल्यावर, तुम्हाला बोलायला काय जाते, असेही कोणाला वाटणे स्वाभाविक आहे.