प्रश्न अवघड आहे. याचे उत्तर मिळवण्यसाठी संत, महात्मे, तत्वज्ञ यांनी आपली आयुष्ये खर्ची घातली आहेत. आणि प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार आयुष्याचा अर्थ वेगळा आहे.
अशा वेळेस काही गोष्टी लक्षात घेतल्या तर कदाचित याचा त्रास कमी होऊ शकतो. अशी अवस्था बऱ्याच लोकांची होते. त्याला त्यांचा प्रतिसाद वेगवेगळा असतो. पण आपण यात एकटे नाही ही भावनाही बरेचदा मनाला शांत करणारी ठरते. मनाला आनंदी ठेवण्यात बरेचदा छोट्या गोष्टी कारणीभूत ठरतात. वर म्हटल्याप्रमाणे ज्याला खरेच गरज असते त्याला मदत केल्यानंतर समाधान वाटते. समुद्राच्या भरती-ओहोटीप्रमाणे आपल्या मनाचीही आवर्तने असतात. कधी सर्वकाही चुकत असूनही त्याबाबत आपण बेफिकीर असतो तर कधी काही कारण नसतानाही उदासिनता येते. अशा वेळी ही अवस्था तात्पुरती आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. (धिस टू शॅल पास!) ढोबळपणे मनाचे दोन भाग असतात. एक भावनिक आणि दुसरा वैचारिक. अशा वेळी वैचारिक भाग सशक्त असला तर आपण भावनांच्या प्रवाहामध्ये वाहून जात नाही. भावना थांबवता येणे किंवा नाकारणे अशक्य असते. आणि तसे करण्याचा प्रयत्न करूही नये. भावनांची दखल घेऊन त्यांना स्वीकारणे आणि त्याचवेळी हाताबहेर न जाऊ देणे हे कौशल्याचे काम असते पण सरावाने साध्य होऊ शकते.
याबाबतीत बरेचदा छंदांमध्ये मन रमवा, आवडत्या गोष्टीसाठी वेळ द्या वगैरे असे उपाय सांगितले जातात. रिकामे मन सैतानाचे घर यात बरेचसे तथ्य आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अमुक गोष्ट करावी का असा विचार करण्यापेक्षा ती गोष्ट केली तर आपोआप उत्साह निर्माण होतो. त्याबाबत विचार करीत बसलो तर आपणच आपल्या मार्गात धोंडे निर्माण करतो.
हे सर्व प्रवचनात्मक वाटू शकेल. पण यातले बरेचसे स्वानुभवांवर आधारलेले आहे. त्याचवेळेस हे सर्व लिहायला, सांगायला खूप सोपे आहे पण आचरणात आणायला अवघड आहे याचीही जाणीव आहे.
सर्वात शेवटी विनोदबुद्धीदेखील बरेचदा मनाचे ओझे हलके करते. आपण बरेच प्रसंग फार गंभीरपणे घेतो, त्याला विनोदाची झालर असली तर त्याचा परिणाम बराच सुसह्य होतो.