'लागून' अशा अर्थाचा 'निगडित' शब्द अगदी बरोबर आहे, त्याला तारांकित करायची  गरज नव्हती. कार्यकर्ताचे स्त्रीलिंगी रूप 'कार्यकर्ती' इतके रूढ झाले आहे की ते आता चुकीचे असले तरी बदलण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. कार्यकर्त्री हे शुद्ध रूप सतत वापरात आले की कालांतराने कार्यकर्ती विसरले जाईल. तसा प्रकार नर्तिका आणि नर्तकीचा आहे. नर्तन, नर्तक, नर्तिका इतके रूढ आहेत की बदलणे अवघड आहे.  लेखक चे स्त्रीलिंग जर लेखिका होते तर नर्तक चे नर्तिका का नको, याला परंपरा याशिवाय दुसरे उत्तर नाही. प्रत्येक शब्दाचे स्त्रीलिंग करता आलेच पाहिजे असे नाही. ससा या शब्दाचे स्त्रीलिंग काय सशी करायचे?  मग पालक चे पालिका, ग्रंथपाल चे ग्रंथपाली?  ग्रंथपालीला पाहून स्त्रियांची घाबरगुंडी उडणार नाही?  त्यामुळे द्रष्टा, नियंता याचे स्त्रीलिंग करू नये. राष्ट्रिय या शुद्ध रूपाऐवजी राष्ट्रीय जसे रूढ झाले तसे स्वादिष्ट समजावे आणि उगाच गरज असली तरी बदलू नये.

विट्ठल शब्द कधीकधी पहायला मिळतो, पण मट्ट किवा मट्ठ कधीही नाही.  जरी अचूक उच्चार करता येत नसला तरी विट्ठलाप्रमाणे विठ्ठल हे रूप शुद्ध समजावे. लख्ख,  मठ्ठ, विठ्ठल, पठ्ठा, मठ्ठा, लफ्फा   हे वापरातून काढणे फार अवघड आहे. कोट्यधीश, कोट्यवधी आणि पारंपरिक ही शुद्ध रूपे आता रूढ होत चालली आहेत, जुनी अशुद्ध रूपे बाद करावीत.

ध्द किंवा व्द ही अक्षरे मात्र लिखाणात कधीही येता कामा नयेत.

बाकी एकंदरीत डॉ कल्याण काळे यांचे परीक्षण आवडण्यासारखे आहे. --Shuddha Marathi