माझ्यामते विठ्ठल, मठ्ठ इ. शब्दांचे खरे उच्चारण विट्ठल असे होते. लागोपाठ होणारे महाप्राण उच्चारता येत नाहीत. स्वादिष्ट या शब्दाचे मूळ रूप स्वादिष्ठ असे होते.
तत्त्वतः व्यंजनपंचकातल्या दुसऱ्या किंवा चौथ्या हकारयुक्त व्यंजनाला दुसरे हकारयुक्त व्यंजन जोडले तर उच्चार करणे अवघड होते ही गोष्ट खरी आहे. परंतु मराठी, हिंदी, पंजाबीत तसे असंख्य शब्द आहेत त्यांचा उच्चार कसाबसा का होईना, पण होतो. उदाहरणार्थ पठ्ठा, लढ्ढा, बुढ्ढा, फुफ्फुस, नथ्थुमल, सख्खा वगैरे. यांना चूक म्हणता येणार नाही, त्यामुळे विठ्ठल, मठ्ठ चूक का म्हणावेत?
स्वादिष्ट ला सुद्धा बरोबर म्हणावे. संस्कृत परोक्ष चे आपण अपरोक्ष केले, उर्दू मशहूरचे महशूर, शिकस्त चा पराजय अर्थ बदलून पराकाष्ठा केला, कर्मठ चा कामसू अर्थ बदलून सनातनी धर्मकर्मनिष्ठ केला, तसेच हेही समजावे आणि मुद्दामहून स्वादिष्ठ प्रचारात आणू नये.
तसेच ब्राह्मण, चिह्न, ह्रास, जिह्वा ऐवजी सहज उच्चारता येण्यासारखी ब्राम्हण, चिन्ह, ऱ्हास, जिव्हा ही रूपे विकल्पाने वापरणे गैर समजू नये असे मला वाटते.