संगीत आजही चांगले आहे. अदितींनी म्हटल्याप्रमाणे, कर्णमधूर संगीत देणारे संगीतकार आजही आहेत. ती गाणारे श्रेया घोषाल, सोनू निगम सारखे गायक ही आहेत. पण ती गाणी क्वचितच ऐकायला मिळतात.
आजकाल जोरदार परफॉर्मन्सचे दिवस आहेत. जे गाणे ऐकताना श्रोते/प्रेक्षक नाचतात ते गाणे चांगले समजले जाते. तेच खाजगी रेडिओ केंद्रावर ऐकवले जाते. मन शांत करणारी गाणी ऐकायला कोणाला वेळ नसावा/आवड नसावी असाच बहुतेक रेडिओ/टि.वी केंद्रांचा समज असावा.
पण तरीही, आजची गाणी कालच्या गाण्यांच्या तुलनेत डावी वाटतात. जुनी गाणी हजार वेळा ऐकली तरीही परत परत ऐकाविशी वाटतात. शिळी वाटत नाही. रेडिओ/टि.वी सर्फींग करताना कानावर पडली तर हात तिथेच थांबतो. ती मजा नवीन गाण्यात नाही. (टिवी वरच्या लोकप्रिय अंत्याक्षरी कार्यक्रमातील तरुण मंडळीना नविन गाणी चटकन आठवत नाहीत, त्याना जुनी मात्र चटकन आठवतात)
श्रेया घोषाल चे "सो जाऊ मै तुम अगर मेरे खाबोंमे आओ", बी जयश्रीचे "जरा जरा बहकता है" ही गाणी बऱ्याच वेळा ऐकली. पण जर सतत ७-८ वेळा ऐकली तर मग ती एकदम सामान्य वाटायला लागतात. तसे जुन्या गाण्यांच्या बाबतीत होत नाही. नवी गाण्यांच्या गीतरचना आणि गायकी, संगीताच्या तुलनेत कमी पडतात असे वाटते.
जुन्या गाण्यांमध्ये मेलोडी होती. वाद्यांचा वापर दोन कडव्यांच्या मध्ये जास्त केला जाई आणि गायक गात असताना, वाद्यमेळ अगदी हळू, गाण्याला पोषक असाच असे. पण आता वाद्यांवर भर जास्त असतो. कॉंप्युटराइज्ड रेकॉर्डींग करण्याच्या सोयीमुळे कधी कधी दोन ओळीदरम्यान गायकाने घेतलेली विश्रांती लक्षात येते. त्यामुळे गाणे सलग वाटत नाही. गायकीचा खरा कस लागत नाही असे त्यामुळे वाटते. प्रत्येक ओळ स्वतंत्रपणे गायली तर मग कसले ते गाणे? सोनू निगम चे "अजनबी शहर" हे गाणे छान आहे पण प्रत्येक ओळ वेगळी गायली आहे हे लगेच लक्षात येते.
मला असे वाटते की आजची गाणी ही तंत्राच्या बाबतीत कालच्या गाण्यांपेक्षा खुप पुढे आहेत. पण त्याच तंत्रज्ञानामुळे त्यांच्यातील ओलावा हरवला आहे. जुनी गाणी हृ्दयाला भिडत, आजची तशी वाटत नाही.
शेवटी मिक्सर वर वाटप वाटून, केलेला स्वयंपाक हा कितीही झटपट झाला तरी, त्याला पाट्यावर वाटप वाटून केलेल्या स्वयंपाकाची चव नाही हेच खरे.