हे थोडेसे अवांतर होते आहे, पण लेखाच्या मूळ विषयापासून फार दूर नाही, असे वाटते.

अलिकडेच मोदी हिंदुस्तान टाईम्सच्या एका परिसंवादात गेले होते तो समग्र कार्यक्रम यु-ट्युबवर बघितला. परिसंवाद खरे तर 'केंद्र सरकार व राज्य सरकारांची आपापली स्थाने' अशा काही विषयाचा होता. त्यात ठरल्य्याप्रमाणे मोदींनी सुमारे दहा मिनीटांचे भाषण केले. सदर कार्यक्रमाचा ह्यापुढील भाग किती ठरवल्याप्रमाणे (agenda) होता, वा किती 'उत्फुर्तपणे' हे मला नक्की सांगता येत नाही. कारण त्यांचे भाषण संपल्यावर लगेचच कार्यक्रमाचे संचलन करणारे श्री. राजदीप सरदेसाई ह्यांनी मोदींना गुजरात दंगलीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. 'हे ऍजेंड्यात बसते आहे का?' असे काहीतरी मोदी म्हणाले खरे, पण हे असेच पुढे चालू राहिले. म्हणजे पुढील सर्व कार्यक्रमात सरदेसाई व तिथे बसलेले बरेच पत्रकार मोदींना प्रश्न विचारत होते व मोदी त्यांना जमेल तशी उत्तरे देत होते. एका प्रथितयश समूहाने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात अर्थातच दिल्लीतील (पक्षी: देशातील) बऱ्याच वरच्या (ज्येष्ठतेने) पातळीवरचे पत्रकार हजर असावेत, असे म्हटले तर ते चूक ठरू नये.

तर ह्या पत्रकारांनी मोदींना जे प्रश्न विचारले त्यातील काही प्रातिनिधीक प्रश्न असे होते (पुढे त्यांची उत्तरे मोदींनी दिली, ती दिली आहेत). हे सर्व मी आठवणीतून लिहीत आहे, तरीही त्यात फार चुका नाहीत.

१. 'इरफान पठाणने चांगला खेळ करून दाखवल्यावर त्याबद्दल तुमच्या सरकारने पाच दिवस काहीही केले नाही!'

उः खरे तर आम्ही त्यावेळी काय केले ते आपल्यापर्यंत पाच दिवसांनी पोहोचलेले दिसते! (पत्रकार स्तंभित!). (मग पुढे मोदी म्हणतात...) कारगिलसारख्या युद्धात आपल्या सैनिकांनी शत्रू देशाविरुद्ध प्राणांची बाजी लावली व आपण शेवटी विजयी झालो. तेव्हा त्यांना काहीही बक्षिस दिले पाहिजे असे आपल्यापैकी कुणीही म्हणाल्याचे स्मरत नाही. (प. स्तं).

२. 'आपण आता जी काही कार्ये गुजराती जनतेसाठी करत आहात, त्यात सरकार व जनता असे न दिसता 'मोदी व जनता' असे दिसत राहते. (म्हणजे हे सर्व खूपच वैयक्तिक पातळीवर आहे).

उः ह्यावर मोदींनी अशा काही कार्यक्रमांची जंत्री वाचली, की जे गुजरातमध्ये बऱ्यापैकी जनताभिमुख असावेत. हे सर्व सरकारचे उपक्रम आहेत [म्हणून ते मी नसल्यावरही चालू राहणार आहेत]. आता सांगा, ह्यात मोदी कुठे आहे?

(ह्यावर प. चे उत्तर नाही).

सरतेशेवटी एक स्त्री पत्रकार उठल्या. त्यांच्या देहबोलीवरून त्या (बहुधा मोदींना बघूनच) खूप चिडलेल्या आहेत असे सहजपणे वाटत होते. त्यांचे मोदींना असे सांगणे होते की आपण काही बहुतांशी (टक्क्यांच्या हिशेबात) मते मिळवून सत्तेवर आलेला नाहीत. तेव्हा आपण असे समजू नका की आपली सर्व मते व आपले सर्व कार्य गुजरातेतील बहुतांश जनतेला मान्य आहे.

उः (आपला नक्की प्रश्न काय आहे, असे इथे मोदींना विचारावे लागले. मग त्या बाईंनी थोडेसे जास्तच रागावून, जास्तच ओरडून तो 'प्रश्न' परत विचारला).

अहो, ही तर आपली लोकशाहीची व्यवस्थाच अशी आहे. १०० % टक्क्यातील ५०% मते देणार, त्यात ज्याला २६ % अथवा अधिक पडणार तो सत्तेवर येणार. [ह्याला मी काय करू बुवा?]  

राजदीप सरदेसाई हे मोदींपासून सुमारे पाच फूट अंतरावर बसलेले असतांना असे जोरदार हातवारे करत होते--- विशेषतः त्यांचा उजवा हात, जो अनेकवेळा मोदींपासून एका फूटावर येई--- की मला वाटले ह्यांना शक्य झाले तर मोदींवर तो हातही चालवायचा आहे. (अर्थातच मी कदाचित नको ते बघत असेन, आणि त्याचा विचार करत असेन!) मोदी बोलत असतांना त्यांना मध्येच तोडून आपणही बोलत राहणे, हेही त्यांनी सहजपणे केलेच.

मोदींची देहबोली अस्वस्थ माणसाची होती. त्यावरून वाटले (व त्यांच्या स्वतः विषयीच्या बोलण्यावरूनही) की ते मुलतः कार्यकर्त आहेत. भाषणे देणे, मुत्सद्देगिरी ह्या बाबतीत ते अनभिज्ञ असावेत. 

तर मुद्दा हाः जर देशातील सगळ्यात ज्येष्ठ पत्रकार असे प्रश्न एका नेत्याला एका छोट्याश्या वार्तालापात विचारणार असतील, तर उठवळ तथाकथित 'पत्रकरां'कडून काय अपेक्षा ठेवायच्या?